“सावरकरांविषयी मानहानीकारक वक्तव्यं राहुल गांधी करताहेत…, त्यामुळं त्यांना आहोटी लागेल; महाराष्ट्रात काँग्रेसला अडचण निर्माण होईल”, सामनातून राहुल गांधींचे टोचले कान

सावरकर हे जगातील महान व्यक्तीमत्तव आहे, पण त्यांना राजकारणात ओढून खुजे केले जात आहे. राहुल गांधी वीर सावरकरांविषयी जी मानहानीकारक वक्तव्यं करत आहेत, त्यामुळं त्यांच्याविषयी आहोटी लागेल, महाराष्ट्रात काँग्रेसला अडचण निर्माण होईल, अस आज सामनातून राहुल गांधींचे कान टोचण्यात आले आहेत.

मुंबई- हुकूमशहा हा सदैव डरपोकच असतो. हुकूमशहा आधी न्यायव्यवस्था ताब्यात घेतो, संसदेवर ताबा मिळवतो व विरोधकांना नष्ट करतो. यालाच गुलामी म्हणतात. याच गुलामीविरुद्ध लढण्यासाठी वीर सावरकरांनी ( Veer Savarkar) वयाच्या बाराव्या वर्षी घरातील अष्टभुजा देवीसमोर क्रांतिकारक शपथ घेतली, ‘‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन!’’ राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अशीच शपथ घेऊन सध्याच्या गुलामीविरुद्ध लढा उभारायला हवा, असं आज सामनातून म्हटलं आहे. राहुल गांधी वारंवार बोलत आहेत की, मी घाबरत नाही. मला तुरुंगात (Jail) डांबले तरी प्रश्न विचारत राहीन. श्री. राहुल गांधी हे घाबरत नाहीत व अदानी – मोदी संबंधांवर वारंवार प्रश्न विचारीत आहेत हे खरेच, पण राहुल गांधी यांनी स्वतःबरोबरच त्यांच्या संपूर्ण पक्षाला व देशालाही निर्भय बनविण्याची गरज आहे.

स्वत:च्या पक्षातील योद्धे उभा करावे लागतील…

“माझे आडनाव सावरकर नाही”, अशी विधाने वारंवार करून ही निर्भयता निर्माण होणार नाही व वीर सावरकर यांच्या बाबतीत जनतेच्या मनात असलेल्या श्रद्धेलाही तडा जाणार नाही. वीर सावरकर हे त्यांच्या जागी थोर आहेत. सावरकरांना अकारण ‘माफीवीर’ वगैरे दूषणे लावून लढण्याचे बळ कुणाला मिळणार नाही. ‘वीर सावरकर’ या नावात तेज आहे. अन्याय व गुलामीविरुद्ध लढण्याचे बळ आहे. वीर सावरकरांनी इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी इंग्लंड व आपल्या देशातही योद्धे निर्माण केले, त्या योद्धय़ांनी जुलमी राज्यकर्त्यांवर ‘धाडधाड’ गोळया चालवल्या व त्या कृत्याबद्दल सावरकरांनी कधीच खेद व्यक्त केला नाही. सावरकरांनी इंग्रजाविरोध योद्धे उभा केले. तसे राहुल गांधींना स्वत:च्या पक्षातील योद्धे उभा करावे लागतील, असं आज सामनातून म्हटलं आहे.

…तर त्यामुळं आहोटी लागेल

नाशिकचा कलेक्टर जॅक्सनच्या वधाचे सूत्रधार म्हणून वीर सावरकरांना काळय़ा पाण्याची शिक्षा ठोठावली. राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेतली, पण सावरकरांची ‘बॅरिस्टर’ ही पदवीच इंग्रजांनी काढून घेतली. त्यांचे सर्व साहित्य जप्त केले. वीर सावरकरांचे जीवन प्रेरणादायी होते व राहील. सावरकर इंग्रजांना कधीच घाबरले नाहीत. पन्नास वर्षे काळय़ा पाण्याची शिक्षा ठोठावल्यावरही ते हसत हसत म्हणाले, “पण इंग्रजांचे राज्य माझ्या देशावर पन्नास वर्षे राहील काय? त्याआधीच ते उलथवून टाकू.” वीर सावरकर समजून घेण्यासाठी मोठे मन व वाघाचे काळीज पाहिजे. सावरकरांचा अवमान वा त्यांच्यावर चिखलफेक करण्यापूर्वी सावरकरांचे मोठेपण समजून घेतले तर स्वातंत्र्यवीरांची बेअदबी अथवा हेटाळणी करण्यास कोणीही धजावणार नाही. कोण होते सावरकर? सावरकर हे जगातील असे एकमेव स्वातंत्र्य योद्धे होते, ज्यांना जन्मठेपेच्या दोन-दोन शिक्षा झाल्या. सावरकर हे जगातील महान व्यक्तीमत्तव आहे, पण त्यांना राजकारणात ओढून खुजे केले जात आहे. राहुल गांधी वीर सावरकरांविषयी जी मानहानीकारक वक्तव्यं करत आहेत, त्यामुळं त्यांच्याविषयी आहोटी लागेल, महाराष्ट्रात काँग्रेसला अडचण निर्माण होईल, अस आज सामनातून राहुल गांधींचे कान टोचण्यात आले आहेत.