पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर; लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांकडून घोषणा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर याप्रकरणी विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हा मोठा फ्रॉड असल्याचे म्हटले असतानाच शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चोराला न्यायाधीश केल्याची टीका केली.

    मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर याप्रकरणी विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हा मोठा फ्रॉड असल्याचे म्हटले असतानाच शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चोराला न्यायाधीश केल्याची टीका केली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संवैधानिक मूल्यांची सर्वात मोठी थट्टा असल्याचे म्हटले आहे.

    महाराष्ट्र विधानभवनात शनिवारपासून सुरू झालेल्या 84 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व सचिव परिषदेमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली. आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेणारे राहुल नार्वेकर यांच्यावर आता एक नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

    ज्या माणसाने आतापर्यंत १० पक्षांतरे केली आहेत, सहज पचवून ढेकर दिली आहे, ज्या व्यक्तीने शिवसेनेच्या फुटीला मान्यता दिली, अशा व्यक्तीची राजकीय पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी निवड होत असेल तर तो काय महान माणूस असू शकेल. राहुल नार्वेकर भाजपचा हस्तक म्हणून निर्णय दिला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    संवैधानिक मूल्यांची सर्वात मोठी थट्टा

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेच्या १० व्या परिशिष्टाच्या संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून राहूल नार्वेकर यांची निवड होणे यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते? राजकीय स्वार्थासाठी तत्त्व आणि नैतिकतेला मूठमाती दिली त्याला नेमणे म्हणजे संवैधानिक मूल्यांची थट्टा आहे.