वेश्या व्यवसाय चालणाऱ्या लॉजवर छापा; लॉजचालक अन् पिडीत तरूणीस पोलिसांनी घेतले ताब्यात

मंगळवेढा (Mangalwedha) ते सांगोला (Sangola) मार्गावरील लेंडवे चिंचाळे हद्दीत हॉटेल ज्ञानेश्‍वरी लॉजवर चालणार्‍या वेश्या व्यवसायादरम्यान डमी ग्राहक पाठवून पोलिस (Police) पथकाने छापा टाकून व्यवसायिक अविनाश विष्णू येडगे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी व २२ वर्षीय तरुणीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  मंगळवेढा : मंगळवेढा (Mangalwedha) ते सांगोला (Sangola) मार्गावरील लेंडवे चिंचाळे हद्दीत हॉटेल ज्ञानेश्‍वरी लॉजवर चालणार्‍या वेश्या व्यवसायादरम्यान डमी ग्राहक पाठवून पोलिस (Police) पथकाने छापा टाकून व्यवसायिक अविनाश विष्णू येडगे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी व २२ वर्षीय तरुणीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या कारवाईनंतर अन्य ठिकाणी चालणारे वेश्या व्यवसायावरही पोलिसांनी छापे टाकून संतांच्या भूमीतील वेश्या व्यवसाय पूर्णतः हद्दपार करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

  पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरिक्षक रणजित माने यांना मंगळवेढा-सांगोला मार्गावर लेंडवे चिंचाळे हद्दीत असलेल्या ज्ञानेश्‍वरी लॉजवर पैसे घेऊन अवैध मानवी व्यापार चालू आहे. अशी गोपनीय माहिती मिळताच त्यांनी पोलिस अधिक्षक शिरिषकुमार सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक सत्यजीत आवटे, पोलीस उपनिरिक्षक अशोक बाबर, सलीम शेख, सहाय्यक फौजदार अविनाश पाटील, महिला पोलीस नाईक सुनिता चवरे, व पोलीस शिपाई अंजना आटपाडकर यांच्या पथकाने सदर लॉजवर दि. १४ रोजी सायंकाळी ६.१० वा. बनावट ग्राहक पाठवून या व्यवसायाबाबत संपूर्ण माहिती जाणून घेवून त्याची पोलखोल केली. यावेळी ग्राहकाला १२०० रुपये मागण्यात आले. त्यामधील ५०० रुपये सदर पिडीतेस तर ७०० रुपये स्वतःच्या फायद्याकरीता आरोपीने ठेवून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. याची फिर्याद एका महिला पोलिसांनी दिल्यानंतर लॉज चालक अविनाश विष्णू येडगे (रा. तनाळी ता. पंढरपूर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून पिडीत महिला व आरोपीस ताब्यात घेण्यात आले.

  पोलीस प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी

  दरम्यान यापुर्वीही शहरापासून ८ कि.मी. अंतरावर चालणाऱ्या सोलापूर रोडवरील वेश्या व्यवसायावरून मोठे कांड घडले होते. दोन महिलांना पंढरपूर तालुक्यातून आलेल्या ग्राहकांनी केबलच्या सहाय्याने मारण्याचा प्रकार घडला होता. याबाबत पोलिसांत गुन्हाही दाखल झाला होता. भविष्यात वेश्या व्यवसायावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही याची पोलीस प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.

  मंगळवेढा शहर हद्दीतील राष्ट्रीय महामार्गालगत चालणारा वेश्या व्यवसाय बंद करण्याबाबत मी पोलीस अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून बंद करण्याची मागणी केली आहे. कायदे सर्वाना समान असताना कारवाईत दुजाभाव पोलीस प्रशासन करीत आहे. हा वेश्याव्यवसाय चालत असल्याची संपूर्ण माहिती पोलीस प्रशासनास असतानाही कारवाईसाठी टाळाटाळ केली जाते. येथूनच कॉलेजला येणारे जाणारे विदयार्थी प्रवास करतात. या तरूण पिढीने काय आदर्श घ्यावा. संतांच्या भूमीत हा घाण व्यवसाय चालत असल्याने महिला वर्गाची कुचंबना होत आहे. हा वेश्या व्यवसाय तात्काळ बंद न झाल्यास शुक्रवारपासून पोलीस स्टेशनसमोर बोंबाबोंब आंदोलन करणार आहे.

  - प्रभाकर देशमुख, अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना