गोव्यातील बनावट देशी दारुच्या कारखान्यावर छापा; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मामुर्डी भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा कारवाई करत मोठी कारवाई केली असून, गोव्यातील बनावट देशी दारुची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला आहे.

    पुणे : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मामुर्डी भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा कारवाई करत मोठी कारवाई केली असून, गोव्यातील बनावट देशी दारुची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला आहे. या कारवाईत देशी दारुच्या २१ लाखांच्या ६० हजार बाटल्या तसेच टेम्पो असा ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    झुल्फिकार ताज आली चौधरी (वय ६८, रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश), अमित ठाकूर आहेर (वय ३०, रा. बोरमाळ, पारसवाडा, कोचाई, ता. तलासरी, जि. पालघर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    राज्य उत्पादन शुल्क विभाग अवैध मद्याचा वाहतूक व निर्मीती करणाऱ्यांची माहिती काढत होते. तेव्हा मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर मामुर्डीत ट्रकमधून बेकायदा मद्य वाहतूक होत असल्याचे समजले. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाच्या पिंपरीतील पथकाने सापळा लावला. तेव्हा संशयित ट्रकची पाहणी केली. त्यावेळी गोव्यातील बनावट देशी दारूची बेकायदा वाहतूक होत असल्याचे उघड झाले. ट्रकमध्ये ६०० खोक्यात ठेवण्यात आलेल्या दारुच्या ६० हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.