Raid on IPL cricket betting! Police confiscated property worth Rs 2 lakh 52 thousand and arrested three persons

गुप्ता अपार्टमेंट येथे काही इसम आतून बंद असलेल्या फ्लॅटमध्ये लोकांकडून मोबाईलवर राजस्थान रॉयल्स व गुजरात टायटन्स यांच्या दरम्यान सुरु असलेल्या फायनल मॅचवर हारजीतचा क्रिकेट सट्टा खेळत असल्याचे समजले. फ्लॅटमध्ये जाऊन खात्री केली असता तीन इसम मोबाईलवर लोकांकडून क्रिकेट मॅचवर सट्टा व जुगार खेळत असल्याचे दिसले.

    वर्धा : आयपीएल क्रिकेट सट्टा जुगारावर सावंगी (मेघे) पोलिसांनी धाड टाकून तिघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवार ३० मे रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान, सावंगी मेघे भागातील टीटीनगर, गुप्ता अपार्टमेंट येथे करण्यात आली.

    मिळालेल्या गुप्त माहितीवरुन टीटीनगर, गुप्ता अपार्टमेंट येथे काही इसम आतून बंद असलेल्या फ्लॅटमध्ये लोकांकडून मोबाईलवर राजस्थान रॉयल्स व गुजरात टायटन्स यांच्या दरम्यान सुरु असलेल्या फायनल मॅचवर हारजीतचा क्रिकेट सट्टा खेळत असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक रुचिरा पात्रे, पोलीस नाईक आकाश चुंगडे, स्वप्नील मोरे, दिनेश करलुके, प्रकाश खार्डे यांचे पथक खाजगी वाहनाने रवाना झाले. फ्लॅटमध्ये जाऊन खात्री केली असता तीन इसम मोबाईलवर लोकांकडून क्रिकेट मॅचवर सट्टा व जुगार खेळत असल्याचे दिसले.

    यावेळी पोलिसांनी नितीन रतनलाल साहु (वय ३०) रा. सिंदी मेघे रामनगर, पीयूष भारत राडे (वय २२) रा. ज्ञानेश्वर नगर, रामनगर वर्धा व अक्षय दिपकराव काळुसे (वय २५) रा. तुळजाईनगर रामनगर, वर्धा या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लॅपटॉप, २ टॅब, ९ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, २ मोपेड गाड्या व इतर साहित्य असा एकूण २ लाख ५२ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर आरोपीविरुध्द कलम मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पो. नि. धनाजी जळक यांच्या निर्देशाप्रमाणे पोउपनि महेश ईटकर, रुचिरा पात्रे, पोलीस नाईक आकाश चुंगडे, स्वप्नील मोरे, दिनेश करलुके, प्रकाश खार्डे, विष्णु काळुसे, प्रतिक लगडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोउपनि महेश ईटकल हे करीत आहेत.