
पिंपरी : पोलिस आयुक्तालयातील एक पोलिस उपनिरीक्षक ड्रीम्स इलेव्हनवर (११) ऑनलाईन गेम खेळून चक्क करोडपती झाला आहे. या गेममध्ये संबंधित पोलिस अधिकाऱ्याला तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले आहे. सोमनाथ झेंडे असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. दरम्यान, झेंडे हे पोलिस अधिकारी असून कर्तव्यावर असताना जुगार सदृश्य गेम कसे खेळू शकतात, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी काही लोक करीत आहेत. तर, काही लोक त्यांचे कौतुक करत त्यांच्या आनंदात सहभागी होत आहेत.
सोमनाथ झेंडे हे सध्या आरसीपी पथकात कार्यरत
ऑनलाइन गेमच्या माध्यमातून करोडपती झालेले सोमनाथ झेंडे हे सध्या आरसीपी (दंगा काबू पथक) पथकात कार्यरत होते. मंगळवारी ( १० ऑक्टोबर) उर्से टोलनाका येथे बंदोबस्तात असताना त्यांना ड्रीम ११ या ऑनलाईन गेममध्ये तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागल्याचे समजले. ही बातमी वेगाने सर्वत्र पसरली.
पोलिस अधिकारी कसा काय ऑनलाईन
अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. मात्र, कर्तव्यावर असताना पोलिस अधिकारी कसा काय ऑनलाईन गेम खेळू शकतो, ड्रीम्स ११ हा एका प्रकारचा जुगार आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी काही करीत काहींनी झेंडे यांच्यावर टीका केली आहे. तर, काहींनी नशीबवान आहे हा अधिकारी, अशी प्रतिक्रिया देत त्यांच्या आनंदात सहभागी झाले आहेत.
तीन वर्षांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा…
पोलिस उपनिरीक्षक झेंडे हे पूर्वी चाकण पोलिस ठाणे नेमणुकीस होते. दरम्यान, डिसेंबर २०२१ मध्ये त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एक गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी झेंडे यांनी एकाकडे ८५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी लाचलुचपत विभागाने झेंडे यांच्यासाठी एका खासगी इसमाला पैसे घेताना रंगेहात पकडले. याची दखल घेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी झेंडे यांना तडकफडकी निलंबित केले होते.
भाजपकडून कारवाईची मागणी…
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत नियुक्तीस असलेले पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे ऑनड्यूटी असताना ऑनलाइन जुगार खेळतात. त्यातून त्यांना काही रक्कम मिळाली. त्याचा गाजावाजा करून त्यांनी ऑनलाइन जुगाराला चालना देण्याचे काम केले आहे. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी विनंती भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात यांनी केली आहे.
काय होऊ शकते कारवाई…
सोमनाथ झेंडे हे कर्तव्यावर असताना ऑनलाईन गेम खेळत होते. त्यामुळे त्यांच्यावर कर्तव्यावर असताना मोबाईलचा वापर, कामात हलगर्जीपणा या कारणासाठी कारवाई होऊ शकते. ड्रीम ११ वर गेम खेळणे हा गुन्हा आहे, असे कुठेही नमूद नाही. त्यामुळे कर्तव्यावर असताना मोबाईलचा वापर, गेम खेळणे, या कारणासाठी जी कारवाई होते तीच कारवाई झेंडे यांच्यावर होणे अपेक्षित आहे, अस काही कायदेतज्ज्ञांनी सांगितले.
काय म्हणाले सोमनाथ झेंडे पाहा
मी रात्रीच्या वेळी गेम खेळायचो. गेल्या दोन महिन्यांत मी पाच ते सहा वेळा गेम खेळलो. मंगळवारी अचानक मला दीड कोटींचे बक्षीस लागले. मी मनोरंजनासाठी ही गेम खेळत होतो. या गेमला कोणती बंदी नाही, त्यामुळे मी खेळत होतो. मला बक्षीस लागल्यावर अनेकांनी माझे अभिनंदन केले.
– सोमनाथ झेंडे, पोलिस उपनिरीक्षक
पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिस उपयुक्त स्वप्ना गोरे या करणार आहेत.
– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी