बहिणीच्या नवऱ्याने केली भावाची हत्या, रायगड पोलीसांनी ठोकल्या बेड्या, दोन दुहेरी हत्या केल्याचा मोठा खुलासा

विजय रमेश शेट्टी या नावाने राहत होता. विजय हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने ९० च्या दशकात त्याची बहीण शांताबाई हिचा पती सिद्धप्पा व पतीचा भाऊ बसप्पा या दोघांची निर्घुण हत्या केली होती.

  अलिबाग : कोलाड येथील रेल्वे गेट मन चंद्रकांत कांबळे यांच्या मारेकऱ्याला रायगड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. विजय रमेश शेट्टी असे त्याचे नाव आहे. बहिणीसाठी १० लाखांची पोटगी मागितल्याने चंद्रकात यांची विजयने हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर याआधी दोन दुहेरी हत्याकांड केल्याचे रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.

  पाले बु.ता.रोहा येथे राहणारे चंद्रकांत कांबळे यांची बहीण विमल हिचा विवाह २०१६ मध्ये विजय रमेश शेट्टी सोबत झाला होता. ते रोह्यातील धाटाव येथे राहत होते. काही महिन्यांपासून विजय व त्याची पत्नी विमल यांचे पटत नव्हते. म्हणून विमल तिच्या माहेरी अर्थात भाऊ चंद्रकांत याचेकडे राहण्यास होती. ती विजय शेट्टी याचेकडे घटस्फोट मागत होती.

  विजय शेट्टीकडे चंद्रकांत कांबळे हे बहिण विमल हिच्यासाठी १० लाखांची पोटगी मागत होते. त्यावरुन विजय शेट्टी याने तुझ्या भावाला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी पत्नी विमलला दिली. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची टीम कामाला लागली. मिळालेल्या पुराव्यावरुन ही हत्या विजय यांनेच केली असल्याचे पुढे आले आणि विजयचा शोध सुरु झाला.

  हत्या केल्यानंतर काही दिवसांनी तो अलिबाग येथे एका मित्राला भेटून गेला होता. तांत्रिक तपासात तो अक्कलकोट, जिल्हा सोलापूर याठिकाणी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक, विकास चव्हाण, जितेंद्र चव्हाण, अमोल हंबीर, प्रतिक सावंत, अक्षय सावंत अशी चार पथके तयार करण्यात आली होती. एक पथक अक्कलकोट येथे रवाना झाले होते. अक्कलकोट येथील स्वामी समर्थमंदिर परिसरातून विजयला पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

  विजयकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तूल मॅग्झीनसह, एक एक्स्ट्रा मॅग्झीन व १८ जिवंत काडतुसे, १ रिकामी पुंगळी, हस्तगत केले आहे. दोन्ही हत्यार त्याने चंद्रकांत कांबळे यांची हत्या करणेसाठी दोन महिन्यांपूर्वी बनारस उत्तरप्रदेश येथून दिड लाख रुपयांना त्याने विकत घेतली. अटक केल्यानंतर त्याला रोहा न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

  विजय रमेश शेट्टी हा कलबुरगी, कर्नाटक राज्य येथील मूल रहिवासी असून वयाचे 15 व्या वर्षी त्याचे भावा सोबत रेतीबंदर बेलापूर येथे कामानिमित्त आला होता. त्याचे मुळ नाव लक्ष्मिकांत रेवाणसिद्धप्पा कलशेट्टी आहे. तो विजय रमेश शेट्टी या नावाने राहत होता. विजय हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने ९० च्या दशकात त्याची बहीण शांताबाई हिचा पती सिद्धप्पा व पतीचा भाऊ बसप्पा या दोघांची निर्घुण हत्या केली होती. तसेच सन १९९९ साली उरण येथील एबीजे कंपनीचे मॅनेजर व त्याचा ड्रायव्हर अशा दोन इसमांना गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती प्राप्त झाली होती.

  सदरची कामगिरी अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उप निरीक्षक धनाजी साठे, पोलीस उप निरीक्षक विकास चव्हाण, पोलीस उप निरीक्षक विशाल शिर्के आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार -डख प्रसाद पाटील, दीपक मोरे, पोलीस हवालदार संदीप पाटील, सुधीर मोरे, प्रसन्न जोशी, यशवंत झेमसे, अमोल हंबीर, प्रतीक सावंत, श्यामराव कराडे, जितेंद्र चव्हाण, सुदीप पहेलकर, राकेश म्हात्रे, विकास खैरणार, रुपेश निगडे, पोलिस नाईक विशाल आवळे, सचिन वावेकर, पोलीस शिपाई ईश्वर लंबोटे, भरत तांदळे, बाबासो पिंगळे, अक्षय सावंत, अक्षय जगताप, ओंकार सोंडकर, मोरेश्वर ओंबळे, लालासो वाघमोडे, स्वामी गावंड, रुपेश पाटील सायबर पोलीस ठाणेचे तुषार घरत, अक्षय पाटील. यांनी या गून्हयाचे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.