स्वच्छता मोहिमेत वरसोली किनाऱ्यावर सापडले चरस-गांजाच्या पिशव्या, पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी

रविवारी सकाळी सात वाजल्यापासून रायगड जिल्हा परिषदेने वरसोली समुद्र किनारा स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबविण्यास सुरुवात केली.

    अलिबाग : गेले महिनाभरात रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर चरस असणाऱ्या पिशव्या सापडल्या आहेत. महात्मा गांधी जयंतीनिमित्त रायगड जिल्हा परिषदेने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत वरसोली समुद्र किनाऱ्यावर चरस असणाऱ्या पिशव्या सापडल्या आहेत.

    रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना संपर्क करून या चरस असणाऱ्या सुमारे आठ पिशव्या निदर्शनात आणून दिल्या. पोलीस अधीक्षकांनी तातडीने पंचनामा करून परिसरात शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

    रविवारी सकाळी सात वाजल्यापासून रायगड जिल्हा परिषदेने वरसोली समुद्र किनारा स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबविण्यास सुरुवात केली. मुख्य किनाऱ्यावर स्वच्छता करताना एका कर्मचाऱ्याला एक प्लॅस्टिकची मोठी पिशवी आढळली. त्यावर कचरा असल्याने ती बाहेर काढण्यात वेळ गेला. बाहेर काढलेल्या पिशवीमध्ये अजून सुमारे आठ पिशव्या सापडल्या.

    या सर्व पिशव्यांमध्ये चरस असण्याची शक्यता उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आणि तातडीने जिल्हा पोलिसांना पाचारण करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहचून त्यांनी पाहणी केल्यावर त्या पिशव्यांमध्ये चरस असल्याचे निष्पन्न झाले. अशाच प्रकारच्या पिशव्या गेल्या महिन्यात रायगड किनाऱ्यावर सापडल्या आहेत तब्बल आठ कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे असे सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.