धाराशिवमध्ये मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून रेलरोको; रुळांवर झोपून जोरदार घोषणाबाजी

आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. ठिकठिकाणी रास्तारोको केला जात आहे. अशातच धाराशिवमध्ये मराठा संघटनेकडून रेलरोको करण्यात आला. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

    धाराशिव : आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. ठिकठिकाणी रास्तारोको केला जात आहे. अशातच धाराशिवमध्ये मराठा संघटनेकडून रेलरोको करण्यात आला. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आरक्षण आमच्या हक्काचं आहे. सरकारने आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असं हे आंदोलक म्हणत आहेत.

    धाराशिव रेल्वे स्थानकात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक एकत्र आलेत. रेल्वे रुळांवर बसून आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा आणि आरक्षण मिळवणारच अशा घोषणा दिल्यात. आंदोलन आणखी चिघळूनये यासाठी रेल्वे स्थानकात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त करण्यात आलाय.

    मराठा आंदोलक आक्रमक

    मराठा आरक्षणासाठी काल बीडमध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणावर चिघळलं. काही ठिकाणी जाळपोळ झाली. त्यामुळे शासनाने बीडसह धाराशिवमध्ये संचार बंदीचे आदेश दिले आहेत. संचार बंदीचे आदेश असतानाही धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेत. भुम शहरातील गोलाई चौक येथे रस्त्यावर उतरत टायर जाळून देखील घोषणाबाजी करण्यात आलीये. तसेत धाराशिवमध्ये सलग तिसऱ्या दिवशी बस सेवा विस्कळीत आहे.

    जिल्ह्यातील बस सेवा विस्कळीत

    आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील बस सेवा विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यात बसवर दगडफेकीच्या घटनांसोबतच काल सायंकाळी उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे एक बस पेटवून देण्यात आली. याच अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून ही बस सेवा बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे बस स्थानक परिसरात शुकशुकाट पहिला मिळतोय.