suicide

तणावातून एका रेल्वे कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास (Railway Employee Suicide) लावून आत्महत्या केली. ही घटना कपिलनगर पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. प्रणय मंगल सांगोडे (वय 30, रा. मानवनगर) असे मृताचे नाव आहे.

    नागपूर : तणावातून एका रेल्वे कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास (Railway Employee Suicide) लावून आत्महत्या केली. ही घटना कपिलनगर पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. प्रणय मंगल सांगोडे (वय 30, रा. मानवनगर) असे मृताचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, प्रणय रेल्वेत ट्रॅकमॅन पदावर कार्यरत होता. तो विवाहित असून, त्याला एक मुलगा व मुलगी आहे. जवळपास 15 दिवसांपूर्वीच त्याला मुलगी झाली. त्याची पत्नी नवजात मुलीसह माहेरी गेली होती. त्यामुळे तो घरी एकटाच होता. सांगण्यात येते की, प्रणयला दारूचे व्यसन होते. यामुळे त्याच्यावर अनेकांचे कर्जही झाले होते. गेल्या 3-4 महिन्यांपासून तो तणावात होता. यामुळे तो अधिक दारू प्यायला लागला होता. याच तणावातून त्याने रविवारी दुपारी बेडरुममध्ये छताच्या पंख्याला मफलर बांधून गळफास लावला.

    दरम्यान, पत्नी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ती घरी आली. दार आतून बंद होते. वारंवार दार ठोठावूनही प्रणय दार उघडत नव्हता. त्यामुळे तिने मागच्या दारातून आत प्रवेश केला असता प्रणय गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने शेजाऱ्यांसह नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने प्रणयला तत्काळ खाली उतरवून उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.