कोकण प्रवाशांचा रेल्वेप्रवास शेळ्या मेंढ्यांसारखा, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, जनआंदोलनाचा इशारा

येत्या २३ फेबुवारी रोजी सावंतवाडीसह सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशनवर जनआंदोलन लक्षवेधी उपोषणाचा विचार करावा लागेल असा इशारा सल्लागार नंदन वेंगुर्लेकर, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शुभम परब यांनी दिला आहे.

    सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर पी.आर.एसी तिकीट कोटा मिळावा यासाठी एलटीटी मडगाव, नागपूर, पुणे, जनशताब्दी, नेत्रावती गाड्यांना थांबा तर नाही उलट मांडवी आणि कोकणकन्यांचे स्लीपर डबे काढून एसी डबे जोडण्यात आले आहेत. मांडवी आणि कोकण कन्या ही कोकणवासीयांची राहिली नाही. यासह विविध मागण्यांचे निवेदन कोकण रेल्वे प्रशासन, रेल्वे बोर्डाकडे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सिंधुदुर्गच्या वतीने देण्यात आले आहे. परंतु प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधी याबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. यामुळे कोकणातील सिंधुदुर्गमधील प्रवाशांना शेळ्या मेंढ्यासारखा प्रवास करावा लागत आहे यावर लक्ष वेधण्यासाठी लवकरच जन आंदोलन लक्षवेधी उपोषण उभारूया असा सूर गावा – गावाच्या बैठकीमधून उमटू लागला आहे. यामुळे येत्या २३ फेबुवारी रोजी सावंतवाडीसह सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशनवर जनआंदोलन लक्षवेधी उपोषणाचा विचार करावा लागेल असा इशारा सल्लागार नंदन वेंगुर्लेकर, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शुभम परब यांनी दिला आहे.

    कोकण रेल्वे गोरगरीब कोकणवासीच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प झाला. या प्रकल्पाच्या प्रश्नासाठी रानबांबुळी, अणाव, ओरोस, तळगांव सुकळवाड, गावराई पडवे गावा गावात ग्रामस्थाच्या बैठका झाल्या आहेत. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष शुभम परब, सचिव प्रकाश पावसकर, सल्लगार नंदन वेगुर्लेकर, मिहिर मठकर, कार्याध्यक्ष नागेश ओरोसकर, महेश परुळेकर आदी सह त्या त्या गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, रेल्वे प्रवाशी संघटना सदस्य, जेष्ठ नागरीक उपस्थित होते. बैठकातील जनसामान्याच्या चर्चा रंगु लागल्या असून कोकण रेल्वेच्या या प्रश्नांवर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यामध्ये कोकण रेल्वे प्रशासनाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वेच्या काही प्रश्नांबाबत प्रवासी संघटनांशी चर्चा केली. सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवरील प्रश्नांबाबत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शुभम परब, सचिव प्रकाश पावसकर, सदस्य स्वप्निल गावडे आदींसह पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. परंतु काल ८ तारखेला रेत्वे प्रशासन रेल्वे मंत्र्याची बैठक घेऊ असे सांगितले होते. परंतु जाणीवपूर्वक रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही त्याचा परिणाम उद्याच्या निवडणुकीतून चिड व्यक्त होऊ शकते असाही काहीचा सुर होता.

    यावेळी झालेल्या चर्चेत कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्ग स्थानकावर विविध समस्या मागण्यांबाबत निवेदन वाचन केले. सिंधुदुर्ग हे रेल्वे स्टेशन जिल्हा मुख्यालयाचे महत्त्वाचे स्टेशन असून या स्टेशनवर सध्या कोकण कन्या, मांडवी, सावंतवाडी, दादर अशा जलद गाड्या थांबतात. जिल्ह्याचे मुख्यालय असूनही जलद गाड्यांना थांबा मिळत नसल्यामुळे रेल्वे तिकीट कोटा ही या स्टेशनवर उपलब्ध नसल्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या शासकीय कामानिमित्त मुंबई व अन्य ठिकाणी जाताना कुडाळ, कणकवलीला जावे लागते. जिल्हाचे मुख्यालय असलेले स्टेशन सिंधुदुर्ग असूनही येथे योग्य त्या सुविधा नाहीत. रेल्वे प्रशासनाने या न्याय प्रश्नांवर लक्ष द्यावे अशी मागणी करणारे निवेदन सादर केले आहे. सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर पश्चिम दिशेच्या बाजूने रस्ता प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर निवारा शेड सायंकाळची सावंतवाडी दादर लोकल ट्रेन सोडावी. दादर – रत्नागिरी रत्नागिरीतून पहाटे ४ वाजता सुटून मडगांव पूर्वीप्रमाणे कायम स्वरूपी सुरु करा. अशा विविध मागण्यांबाबत येथील प्रवासी आक्रमक असून सावंतवाडी येथील टर्मिनल ही पूर्ण व्हावे जेणेकरून या टर्मिनलवरून सावंतवाडी सीएसटी नव्याने रेल्वे मिळू शकेल. महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या या सावंतवाडी स्टेशनवर टर्मिनल व्हावे. कोकण रेल्वे मार्गावरून गोवा, केरळ या दिशेने जाणाऱ्या सुमारे १५ गाड्या सिंधुदुगमध्ये थांबत नाहीत त्यापैकी काही गाड्यांना सावंतवाडी, सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा, सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन सुसज्ज व्हावे. परंतु सध्याचे काम वेळ काढूपणे असून रस्त्यावर धुरळ्याचा प्रवाशांना त्रास होत आहे. आधी मागण्यांचे निवेदन सादर केले होते. यावर संजय गुप्ता यांनी आपल्या या न्याय मागण्यांबाबत रेल्वे बोर्डाकडे निवेदन सादर करू असे आश्वासन दिले होते. परंतु याबाबत अद्यापही रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही किंवा लोकप्रतिनिधी ही रेल्वे प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रेल्वे मंत्री यांच्याशी बैठक घेऊन चर्चा घडवून आणू असे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही यावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे समजते.

    कोकण वासियांची कोकण कन्या मांडवी ही आता पर राज्यातील प्रवाशांची झाली आहे. कोकणातील प्रवाशांवर होणारा हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आम्हाला या रेल्वे गाडीमध्ये तिकीटही मिळत नाही दर दिवशी तिकीट कोटा फुल असतो. परप्रांतीयांनाच त्याचा फायदा अधिक असून स्लीपरचे एसी डबे झाले. कोरोनात सुपरफास्ट दिवा पॅसेजर अजुन ही सुपरफास्टच्या नावाखाली तिकीटाचे दर ही वाढवले आहेत, सावंतवाडी टर्मिनल पूर्ण करून सावंतवाडी रत्नागिरी-दादर किंवा दादर-रत्नागिरी मडगाव अशी स्वतंत्र लोकल ट्रेन कायमस्वरूपी सोडावी. त्याचबरोबर नेत्रावती, जनशताब्दी, एलटीटी मडगाव, गांधीग्राम, नागरकोईल, नागपूर मडगाव यासह ज्या गाडयांना सिंधुदुर्गात थांबा दिला जात नाही अशा गाड्यांना सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा. प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी. यासह माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांच्या सिंधुदुर्गसह सर्व रेल्वे स्टेशनवर फोटो लावण्यास परवानगी मिळावी. कोकणरेल्वे भारतीय रेल्वे सेंट्रल रेल्वेत वर्ग करा अशा मागण्या लावून धरल्या आहेत, जर रेल्वे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास लवकरच आंदोलन लक्षवेधी उपोषण उभारू अशा इशारा देण्यात आला आहे. २३ तारीख ठरवा आम्ही यासाठी सहकार्य करू निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत जर याबाबत शासनाने दखल न घेतल्यास योग्य ते जशास तसे उत्तर देऊया असा परखड मत गावा गावातून होणाऱ्या बैठकातून आले आहे. रेल्वे प्रशासन यावर काय तोडगा काढते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. कोकणरेल्वे प्रश्नांबाबत खारेपाटण ते मडूरापर्यत लोक जागृत संघटीत झाले आहेत. सावंतवाडी, सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर उपोषण जनआंदोलन चळवळ होण्याची शक्यता अधिक व्यापक होऊ लागली आहे.