संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

4 डिसेंबरपर्यंत उत्तर किनारपट्टीवरील तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

    गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये वातावरणात अचानक बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात 25 तारखेपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली यामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसानही झालं. आता पुन्हा राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात (Bay Of Bangal) चक्रीवादळ तयार होत असून महाराष्ट्रासह मध्यप्रदेशमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  2 ते 4 डिसेंबर या काळात देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

    वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज

    भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांत अधिक तीव्र होण्याची अपेक्षा आहे. पुढील 24 तासांत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे पुढील दोन दिवसांत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याशिवाय, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभावही कायम राहणार आहे, यामुळे पर्वतीय प्रदेशात बर्फवृष्टी होईल आणि लगतच्या मैदानी प्रदेशात थंडीची लाट येईल.

    ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट

    तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल किनारपट्टीसाठी हवामान कार्यालयाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 2 ते 4 डिसेंबर या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूतील चेंगलपट्टू, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात जोरदार पाऊस होणयाची शक्यता आहे. 4 डिसेंबरपर्यंत उत्तर किनारपट्टीवरील तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 2 ते 4 डिसेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 3 आणि 4 डिसेंबरला आंध्र प्रदेशात दक्षिण किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.