
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजता झालेल्या मुसळधार पावसाने ओढे- नाले, विहिरी तुडुंब भरून वाहू लागले. पावसाचे पाणी शेतात शिरल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.
वडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजता झालेल्या मुसळधार पावसाने ओढे- नाले, विहिरी तुडुंब भरून वाहू लागले. पावसाचे पाणी शेतात शिरल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.
श्रावण महिन्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळतात परंतु, यंदा श्रावण महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. या पावसाने ओढे- नाले, विहिरी तुडुंब भरून वाहू लागले. नुकत्याच शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसह ऊस लागण झाल्या होत्या. जोरदार पावसामुळे शेतामधून पाणी वाहत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
-सोयाबीन, बाजरी, मक्याचे नुकसान
सोयाबीन, बाजरी, ऊस, मका या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. दरेकर मळा पेरूचा मळा, परांडे मळा, साळूंके मळा, वडगाव निंबाळकर परिसर येथे पाणी साचल्यामुळे ये -जा करण्यासाठी अडचण निर्माण झाली. सरपंच सुनिल ढोले, ग्रामसेवक धावडे, ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य यांनी भेट देऊन तुंबलेल्या पाण्याला वाट करून दिली. तसेच कच्चा रस्त्यावर मुरूम टाकण्यास सुरुवात केली.
-नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
श्रावणात पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेला आहे. येणाऱ्या काळात पावसाचे अशीच अतिवृष्टी झाली तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागामार्फत तातडीने पंचनामे करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन सरपंच सुनिल ढोले यांनी दिले. ग्रामपंचायतीमार्फतही शक्य ती मदत करू, असेही त्यांनी सांगितले.