पावसाने शेतकऱ्यांना रडू, पिके पाण्याखाली; लाखो रुपयांचे नुकसान

शेतकरी वर्गाची हाताशी आलेली पिके पाण्याखाकी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे, शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी शेतकरी बांधवानी केली आहे.

  राजेगाव : अवकाळी पावसाने गेली तीन दिवस जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातील पिके पाण्याखाली गेलेली पाहायला मिळत आहेत. यामध्ये कांदा, ज्वारी. मका, गहू अन्य पिकांचे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. शेतकरी वर्गाची हाताशी आलेली पिके पाण्याखाकी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे, शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी शेतकरी बांधवानी केली आहे.

  अवकाळी पावसाने परिसरातील शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे काही पिके बराच काळ पाण्याखाली राहिली आहेत. तर जोमदार आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेली तीन दिवसापासून पडलेल्या पावसाने शेतकरी वर्गाची चांगलीच धांदल उडाली. पडलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी साचून राहिले आहे.

  सध्या राजेगाव भागात ऊसाचे पिक मोठ्या प्रमाणावर आहे. आणि ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्यांकडून ऊस तोडणीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे मात्र अवकाळी पावसाने हे ऊस तोडणीचे काम काही भागात ठप्प झाले आहे. ऊसाच्या शेतातून ऊसाने भरलेली वाहने बाहेर निघत नसल्याने आता किमान दहा- बारा दिवस तरी काही ठिकाणची ऊसतोड बंद ठेवावी लागणार अशी माहिती ऊस वाहकांनी दिली. येथील कांदा, गहू, मका, ज्वारी आदी पिकांची पावसाने लोळवण झाली आहे. थंडीच्या काळात थंडी गायब झाली असून ढगाळ हवामान व त्यात पावसाची हजेरी यामुळे शेतात नेमके कोणते पिक घ्यावे ?, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे.

  यंदा पावसाळा हंगामात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने खरीप हंगाम जवळपास वायाच गेला आणि रब्बी हंगामावरील शेतकऱ्यांच्या आशा धूसर झाल्या आहेत. निसर्गाचा असमतोल हा काही शेतकऱ्यांना हसू तर काहींना मात्र रडू देवून गेला हे मात्र नक्की. गेली तीन दिवस पडत असलेला अवकाळी पावसामुळे पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल व कृषी विभागाने येथील पिकांची पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. त्यामध्ये राजेगाव, नायगाव, मलठण, वाटलूज, खानवटे आणि स्वामी चिंचोली या भागात मोठ्या प्रमानावर नुकसान झाले आहे.

  अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून आर्थिक मदतीची गरज आहे. काही भागातील गहू पेरणी तर दुबार करण्याची वेळ आली आहे. कृषी व महसूल विभागाकडून पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत कशी मिळते हे पहिले पाहिजे.

  - राजेंद्र कदम (शेतकरी राजेगाव)

  नैसर्गिक समतोल बिगडला आहे. शेती पिके घेणे अवघड झाले आहे. मात्र शेतकरी कसाबसा पिके घेतो मात्र अवकाळीने शेतकऱ्यांना डोके वर काढून देत नाही. या अवकाळीने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

  - दस्तगीर शेख (शेतकरी)