राज ठाकरेंनी घेतला पंतप्रधानांचा खरपूस समाचार; म्हणाले, ‘मुंबईत पण चांगला ढोकळा मिळतो…’

पुण्यातील 100 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनामध्ये राज ठाकरे यांनी घेतला सहभाग. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर जोरदार टीका केली.

    पुणे : पिंपरीतील मोरया गोसावी क्रीडा संकुलावर(Morya Gosavi Krida Sankul) भरवण्यात आलेल्या शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनामध्ये (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) आज (दि.07) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी मराठी कलाकारांना देखील काही सल्ले दिले तसेच राजकारण्यांवर देखील निशाणा साधला. ‘नाटक आणि मी’ ह्या विषयावर मुलाखत देताना राज ठाकरे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर (Bullet Train Project) जोरदार टीका केली.

    मुलाखतीमध्ये राज ठाकरे म्हणाले, “मला बुलेट ट्रेनचं अजून कळलेलं नाही. दोन तासात अहमदाबादला जाणार? आणि  काय करणार जाऊन? ढोकळा खाणार अन् परत येणार. मुंबईत पण चांगला ढोकळा मिळतो. त्यासाठी एक लाख कोटी कशासाठी घालवायचे? मी हे सतत सांगत राहणार. मराठी माणसाने जागृत राहावं. मराठा माणसाचं लक्ष असलं पाहिजे.”

    ते पुढे म्हणाले, “निवडणुका लढवताना अनेकदा मला लाज वाटते. माझे काका, माझे आजोबा हेच करायचे तेच मी आज सांगोतय. 70 वर्षे आम्ही पाणी, लाईट याच विषयावर निवडणूक लढवतोय. आम्ही पुढे कधी जाणार. कलाकार, लेखक नसते तर देशात अराजकता असती. कलावंत आणि कला याबाबत माझ्या जाणीवा जाग्या आहे. त्यामुळे माझ्याकडे कलाकार येतात.”

    कलाकरांनी चारचौघात एकमेकांना मान द्यायलाच हवा – राज ठाकरे 

    मराठी कलाकार एकमेकांना अगदी काहीही हाका मारतात यावरुन देखील राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांचे कान टोचले. राज ठाकरे म्हणाले, ‘तुम्ही मराठी कलावंत एकमेकांना जर मान-सन्मान दिला नाही, तुम्ही एकमेकांना लोकांसमोर, मंचावर आणि इतर ठिकाणी आद्या, पद्या, शेळ्या, मेंढ्या अशा हाका मारत राहिलात, पुष्प्या आलाय…आंड्या आलाय… असं तुम्ही भर मंचावर आणि शेकडो लोकांसमोर बोलता, ही सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळेच आज मराठी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार नाही. मराठीत कलावंत आहेत, पण स्टार नाही. व्यासपीठावर,चारचौघात एकमेकांना मान द्यायलाच हवा असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.