फॉक्सकॉन प्रकल्पाची चौकशी करा, राज ठाकरेंची मागणी

मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray ) यांनी फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी भाष्य केलं आहे. फॉक्सकॉन प्रकरणाची चौकशी व्हावी, असं राज ठाकरे म्हणाले.

    फॉस्ककॉन प्रकल्प (Foxconn project) गुजरातमध्ये गेल्याने शिंदे फडणवीस सरकारवर टीका होत आहे. भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेतील अनेक नेते फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी (Maharashtra) गुजरातमध्ये गेल्याने आरोप – प्रत्यारोप करत आहेत. आता मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray ) यांनी फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी भाष्य केलं आहे. फॉक्सकॉन प्रकरणाची चौकशी व्हावी, असं राज ठाकरे म्हणाले. राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? असा प्रश्न त्यांनी विचारला. नेमकं कुठं फिस्कटलं याची चौकशी व्हावी, तसेच या प्रकरणात पैशांची मागणी केली गेली आहे का याचीही चौकशी व्हावी असं राज ठाकरे म्हणाले.

    राज ठाकरे म्हणाले की, राजकारण वैयक्तिक नसतं, वैचारिक धोरणांवर मी टीका करतो. माझा काही धोरणांना विरोध होता. पंतप्रधान मोदींवरही वैयक्तिक टीका केली नाही, त्यांच्या धोरणांवर टीका केली, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं. मनसेने मविआ सरकारचं कधीच कौतुक केलं नाही. सत्ताधाऱ्यांविरोधात लढूनच पक्ष मोठा होत असतो, असंही ते म्हणाले.

    भाजप शिवसेनेच्या युतीच्या काळात भाजपनं कधीच मुख्यमंत्री पदाची मागणी केली नाही. त्यावेळी १९८९ साली ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री ठरले होते, मग शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. आता मात्र मतदान होतं, निकाल लागतो आणि नंतर वाट्टेल त्या प्रकारे निर्णय घेतले जातात. पंतप्रधान मोदी, अमित शाह हे प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं बोलत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आक्षेप का घेतला नाही? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला. हा मतदारांचा अपमान आहे. या सगळ्या गोष्टी मतदारांसमोर येणं आवश्यक आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

    नागपुरातील मनसेची (Nagpur MNS) सर्व पदं बरखास्त करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. तसेच घटस्थापनेनंतर लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचेही सांगितले.