संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे गुरुवार (दि.१) पासून नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

    नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे गुरुवार (दि.१) पासून नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. असे असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मात्र राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री अशा उल्लेखाचे स्वागताचे बॅनर लावण्यात लावण्यात आल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

    राज्यातील सत्तांतरानंतर सर्वच राजकीय पक्षांना आगामी मुख्यमंत्रिपदाची आस लागलेली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप, शिंदे गट व अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे सरकार आहे. आगामी निवडणूक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार असल्याचे भाजपाकडून सांगितले जात आहे.

    असे असताना अधूनमधून देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री राहणार असल्याचे भाजपकडूनच जाहीर करून चिमटे काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे कमी की काय म्हणून राष्ट्रवादीकडूनही अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावून डिवचण्याचे काम केले जात असल्याने त्याची चर्चा सुरूच असते. अशातच शरद पवार गटाकडूनही सुप्रीया सुळे यांचाही उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला गेला आहे.

    आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आलेले असताना ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या स्वागत फलकावर मनसैनिकांनी राज ठाकरे यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून पहिल्यांदाच उल्लेख करण्यात आल्यामुळे साहजिकच या दौऱ्यात ही चर्चा अधिक रंगली आहे. त्यामुळे या दौऱ्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे.