‘राज ठाकरे मोठ्या मनाचा माणूस, ते सत्तेबाहेर असले तरी…’; मुख्यमंत्र्यांकडून गौरोद्गार

राज ठाकरे मोठ्या मनाचा माणूस असून, ते कोत्या मनाचे नाहीत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. मुख्यमंत्री म्हणाले, मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा अगदी योग्य निर्णय घेतला आहे.

    मुंबई : राज ठाकरे मोठ्या मनाचा माणूस असून, ते कोत्या मनाचे नाहीत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. मुख्यमंत्री म्हणाले, मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा अगदी योग्य निर्णय घेतला आहे. त्यांनी देशाच्या विकासाला महत्त्व दिले आहे. ते सत्तेबाहेर असले तरी लोकांना न्याय मिळावा आणि त्यांची कामे झाली पाहिजेत, अशी राज ठाकरे यांची भावना आहे.

    राज ठाकरे हा अगदी मोकळ्या मनाचा माणूस आहे, तो कट्टू किंवा कोत्या मनोवृत्तीचा नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. आगामी विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला त्यांचा वाटा मिळू शकतो, असे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले. काँग्रेस पक्षाने देशाला 50 ते 60 वर्षात खड्ड्यात घातले. पण मोदीजी देशाचा विकास करत आहेत. त्यामुळेच राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिला. त्यांनी घरी बसणाऱ्यांना किंवा शिव्याशाप देणाऱ्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता का?, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला.

    महायुतीला त्यांचा फायदाच

    महायुतीला राज ठाकरे यांची काय गरज होती? त्यांच्या येण्याने शिंदे गटाची अडचण झाली का? असे प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही सगळे एकत्र आलो तर निवडणुकीत त्याचा फायदा होणारच आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देताना कोणतीही अट ठेवलेली नाही. आगामी विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला काय द्यायचे, याचा विचार होऊ शकतो, आता काहीच ठरलेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.