परप्रांतीयांना जमीन आणि दलाली केली असल्याचे आरोप राज ठाकरे यांनी सिद्ध करावे – खा.विनायक राऊत

रिफायनरी प्रकल्पासाठी आम्ही एक इंच जमीनही परप्रांतीयांना दिली असेल किंवा दलाली केली असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्ध करावे.

    कणकवली : कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, रिफायनरी प्रकल्पासाठी आम्ही एक इंच जमीनही परप्रांतीयांना दिली असेल किंवा दलाली केली असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्ध करावे, अन्यथा त्यांनी रिफायनरी प्रकल्पातील भूमिपुत्रांची माफी मागावी असा टोला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे. काँग्रेसमध्ये असताना छातीठोकपणे रिफायनरीला विरोध करणारे नारायण राणे, नितेश राणे खरे की आता भाजपात गेल्यावर रिफायनरी समर्थन करणारे राणे खरे? कातळशिल्पांचे संवर्धन करण्यासाठी आग्रही भूमिका घेणारे राज ठाकरे खरे की कणकवलीच्या सभेत बारसुमध्ये 200 कातळशिल्पे आढळूनही रिफायनरीचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे? असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

    यावेळी आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, सचिन सावंत, कन्हैय्या पारकर, राजू राठोड, संकेत नाईक आदी उपस्थित होते.

    पुढे विनायक राऊत म्हणाले, सिंधुदुर्गातील 42 हजार हेक्टर जमीन वनसंज्ञेत घालून स्थानिक जमीन मालकांना नारायण राणेंनी देशोधडीला लावले आहे. एमएसएमइचे ऑफिस प्रहार भवनमध्ये भाड्याने सुरू करून स्वतः नारायण राणे हे पहिले लाभार्थी ठरले आहेत. पत्रकार शशिकांत वारीशेचा खुनी पंढरीनाथ आंबेरकर हा भाजपाचा सक्रिय कार्यकर्ता असून रिफायनरीकडून त्याला आर्थिक रसद पुरवली जात असल्याचे सिद्ध झाले आहे. कुडाळ एमआयडीसीमध्ये 70 एकर जमीनीचे मोक्याचे भूखंड राणे समर्थक कार्यकर्त्यांचे आहेत असे विनायक राऊत म्हणाले. मागील अडीच महिन्यांत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या झालेला जाहीर सभा, खळा बैठका, जिल्हा परिषद विभागनिहाय बैठक, विधानसभा निहाय प्रचार सभाच्या माध्यमातून सहकारी मित्रपक्षच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यात यश आले आहे. शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिल्याची आणि जनतेच्या सुखदुःखात सहभागी झाल्याची पोचपावती मतदार 7 मे रोजी मतदानातून देतील. कुडाळ एमआयडीसीमध्ये 70 एकर मधील मोक्याचे भूखंड विरोधी उमेदवार नारायण राणेंच्या कार्यकत्यांनी बळकावले आहेत. राणेंच्या पडवे मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांची आर्थिक लूट केली जाते. नारायण राणेंनी 42 हजार हेक्टर जमीन वनसंज्ञेखाली आणून स्थानिक जनतेला देशोधडीला लावले.

    नारायण राणेंच्या बुडत्या जहाजाला आधार देण्यासाठी कणकवलीत आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणात केवळ उद्धव ठाकरेंबद्दलचा द्वेष बोलून दाखवला. स्वतःचा पक्ष वाढवायची काळजी न घेता राणेंची तळी राज ठाकरे यांनी उचलली. रिफायनरीचे समर्थन केलेल्या राज ठाकरे यांना कालच्या सभेत एका बाजूला नारायण राणे आणि दुसऱ्या बाजूला रिफायनरीसाठी जमिनी विकत घेणारे इस्टेट एजंट स्टेजवर दिसले असते. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर याने पत्रकार वारीशेची हत्या केली. हा पंढरीनाथ आंबेरकर भाजपाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. रिफायनरीसाठी लँड माफिया मिश्रा, शहा हे कुठून आले हे राज ठाकरे यांनी शोधावे. बारसु परिसरात सुमारे 200 कातळशिल्प आहेत, राज ठाकरे कातळशिल्पांचे समर्थन करतात आणि दुसरीकडे राज रिफायनरीचे समर्थन करतात. नेमके खरे राज ठाकरे कुठले? काही वर्षांपूर्वी छातीठोकपणे रिफायनरीला विरोध करणारे नारायण राणे खरे की आता सत्तेपुढे हुजरेगिरी करत रिफायनरीचे समर्थन करणारे नारायण राणे आणि त्यांचे पुत्र खरे? याचा विचार राज ठाकरे यांनी करावा असा निशाणा राज ठाकरेंवर साधला आहे.

    पुढे ते म्हणाले की, खंडणीखोर कार्यकर्त्यांना घेऊन कणकवलीत आलात तरी राणेंसारख्या खुनशी वृत्तीचा बिमोड केल्याशिवाय कोकणी जनता राहणार नाही असा इशाराच विनायक राऊत यांनी दिला. राणे यांनी आणलेल्या प्रतिभा डेअरीने सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे 5 कोटी रुपये ठकविले आहेत. देशातील 80 कोटी लोकांना उद्योग उभारून देण्याचे खाते नारायण राणेंकडे असताना एमएसएमईचे पहिले लाभार्थी नारायण राणे ठरले आहेत. सिंधुदुर्गात रक्तरंजित इतिहास निर्माण करण्याचे काम नारायण राणेंनी केले. उलट मागील 10 वर्षांत आम्ही एकही राजकीय हत्या होऊ दिलेली नाही. नारायण राणे यांनी विकृती आणि अविचार कोकणात आणला. एकीकडे गॅसचा भाव हजार झाला नी मतदारांना एक हजार हे देतायत? ही लाचारी इथल्या मतदारांमध्ये नसल्याने काही मतदारांनी आलेले हजार रुपयांचे पाकीट देवासमोर ठेवून त्यांना मतदान न करण्याचे निश्चित केले आहे. 7 मे रोजी राणेंचा पराभव करून मशाल निशाणीला मतदान करतील असे विनायक राऊत म्हणाले. गेले दहा वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा शांत ठेवण्याचे काम आम्ही केले मात्र विरोधकांकडून माथी भडकविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.