जुवे जैतापूर ग्रामपंचायत १२ वेळा विनविरोध, शासनाचे दुर्लक्ष तर ५४ वर्षांपासून नागरिकांना मागावी लागतेय रस्त्यासाठी भीक

गेली सुमारे ५४ वर्ष ही ग्रामपंचायत कायम बिनविरोध होत असुन या ग्रामपंचायतीवर कायम शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे. मात्र अद्यापही या गावाच्या महत्वाच्या रस्त्याच्या प्रश्नाला शिवसेनेने कायम ठेंगा दाखवला आहे.

    राजापूर : सन १९६९ साली स्थापन झालेली राजापूर तालुक्यातील जुवे जैतापूर ग्रामपंचायत तब्बल बाराव्या वेळीही बिनविरोध झाली असुन या ग्रामपंचायतीच्या इतिहासात एकदाही मतदान प्रक्रिया पार पडलेली नाही. यावेळीही या ग्रामपंचायतीने आपली बिनविरोधी परंपरा कायम राखली असली तरी अद्यापही या गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याचे भयान वास्तव समोर आले आहे.

    जुवे जैतापूर गाव हे जैतापूरला जवळ असून चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. यामुळे भौगलिक क्षेत्रही मर्यादीत आहे. परीणामी येथील बहुतांश ग्रामस्थ नोकरी व व्यवसाय निमित्त बाहेरगावी राहत आहेत. या ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये ८२ मतदारांनी आपली नावे नोंदविली आहेत. यामुळे रत्नागिरी जिल्हातील सर्वाधिक कमी मतदार असलेली ग्रामपंचायत म्हणून तिच्याकडे पाहीले जात आहे. कमी मतदान असतानाही याची रचना तीन प्रभागात करण्यात आली आहे. तर ७ सदस्य संख्या व लोकनियुक्त सरपंच अशी ८ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत हद्दीत तब्बल १०१ घरांची नोंद आहे. जवे जैतापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग कमांक १ मध्ये स्त्री १३ व पुरूष १२ असे २५ मतदार, तर प्रभाग कमांक २ मध्ये स्त्री २४ व पुरूष १४ असे ३८ मतदार, प्रभाग कमांक ३ मध्ये स्त्री १२ व पुरूष ७ असे १९ मतदार असून एकूण ८२ मतदार आहेत. मात्र यावेळीही या जुवे जैतापूर ग्रामपंचायतीने आपली बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखली असुन आता या ग्रामपंचायतीवर शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने आपला दावा केला आहे .

    गेली सुमारे ५४ वर्ष ही ग्रामपंचायत कायम बिनविरोध होत असुन या ग्रामपंचायतीवर कायम शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे. मात्र अद्यापही या गावाच्या महत्वाच्या रस्त्याच्या प्रश्नाला शिवसेनेने कायम ठेंगा दाखवला आहे. गेली कित्येक वर्ष केवळ शिवसेना सत्तेत असतानाही अद्यापही शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी, आमदार व खासदार यांनी हा रस्त्याचा प्रश्न तसाच ठेवला आहे. तर विशेष बाब म्हणजे कायम शिवसेनेचे शिवबंधन बांधणारी ही ग्रामपंचायत आपल्या समस्यांच्या बाबतीतही जागरुक नसल्याने आज ही ग्रामपंचायत समस्यांचे आगर बनली आहे.

    गेली कित्येक वर्ष येथील ग्रामस्थ धाउलवल्ली येथील खारलॅण्ड बंधाऱ्यावरुन रस्त्याची मागणी करत असले तरी प्रशासन चुकीचे अहवाल सादर करुन या गावाला रस्त्यापासुन वंचीत ठेवण्याचेच काम करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ अनिल करंजेसह अन्य ग्रामस्थांनी केला आहे. एकिकडे शासन बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीना लाखो रुपयाच्या बक्षिसांचे अमिष दाखवत असताना जिवन मरणाच्या रस्त्यासाठी मात्र येथील ग्रामस्थांना वाट पाहावी लागत आहे. आरोग्य सुविधा, किराणा, प्राथमिक शिक्षण अशा विविध सुविधांसाठी येथील ग्रामस्थांना जवळच्या जैतापूर बाजारपेठेत जाण्यासाठी कायम होडीचाच आधार घ्यावा लागत आहे. प्रथेप्रमाणे यावेळीही शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने या ग्रामपंचायतीने दावा सांगितला आहे. मात्र कायम सत्तेचे राजकारण करणारी शिवसेना येथील ग्रामस्थाना आता ५४ वर्षानंतर तरी रस्ता देणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागुन राहिले आहे.