करक पांगरी सोसायटीत गैरव्यवहार झाल्याचा नंदकुमार शेट्ये यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

करक पांगरी सेवा सोसायटीने आपल्या मर्जीतील शेतकऱ्यांची प्रापंचीक तसेच घर दुरुस्ती कर्ज ज्या शेतकऱ्यांच्या नावाने एक गुंठाही जमिन नाही त्याना सन २०१७ ते २०२० कर्ज वितरीत केले आहे.

    राजापूर : राजापूर तालुक्यातील करक पांगरी विविध कार्यकारी सोसायटीचे दोन संचालक थकित असतानाही ते थकित नसल्याचा खोटा दाखला देत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पाचल शाखेकडुन सुमारे १८ लाखांचे फेरकर्ज केल्याची तक्रार संस्थेचे सभासद नंदकुमार शेट्ये यानी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तर या संस्थेचे फेर ऑडिट करण्याची मागणी करत कारवाई करण्याची मागणी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

    करक पांगरी विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले सन्मान योजनेअंतर्गत २०१६ ते २०१९ या कालावधीत शेतकऱ्यांचे खाजगी कर्ज शेती कर्जात विलिन करुन कर्जमाफीच्या लाभात बसविले असल्याची माहिती नंदकुमार शेट्ये यानी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

    सोसायटीने ज्या शेतकऱ्यांना घर दुरुस्ती कर्ज दिले अशा शेतकऱ्यांचे कर्ज, कर्ज माफीच्या योजनेत बसवण्यासाठी सोसायटीच्या संचालकानी ते शेती कर्जात वर्ग करण्याचा भिष्म पराक्रम केला असुन ज्या कर्जदारांच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही अशा कर्जदारानाही संस्थेने लाखो रुपयांचे कर्ज देऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप नंदु शेट्ये यानी पत्रकारांशी बोलताना केला आहे. तर संबधित शेती कर्जाच्या सरकारी फेर ऑडिटसाठी त्यांनी चाळीस हजार दोनशे ऐंशी रुपयाची फी स्वता भरल्याची माहिती दिली आहे .

    लेखापरिक्षक रत्नागिरी यांनी सोसायटीला दप्तर ताब्यात देण्यासाठी १५ दिवसांची मुदत देऊनही अद्यापही सोसायटीने कोणतेच दप्तर लेखापरिक्षक रत्नागिरी यांच्याकडे सुपुर्द केले नसल्याचेही नंदू शेट्ये यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना दिलेल्या तक्रार अर्जात नमुद केले आहे.

    सोसायटीचे संचालक स्वता थकित असताना व करक पांगरी विविध कार्यकारी सोसायटी यांची थकित रक्कम सुमारे ७४ लाख असतानाही रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कोणत्या नियमानुसार ही फेर कर्जे केली असा प्रश्न त्यानी अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक यांना एका लेखी निवेदनाद्वारे विचारला आहे. करक पांगरी सेवा सोसायटीने आपल्या मर्जीतील शेतकऱ्यांची प्रापंचीक तसेच घर दुरुस्ती कर्ज ज्या शेतकऱ्यांच्या नावाने एक गुंठाही जमिन नाही त्याना सन २०१७ ते २०२० कर्ज वितरीत केले आहे. त्याची चौकशी करुन या सोसायटीच्या व संबधित कर्जाना जबाबदार असणाऱ्या तत्कालीन शाखाधिकारी व राजापूर तालुका इंस्पेक्टर यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करुन तात्काळ कारवाई करण्याची मागणी शेट्ये यानी या निवेदनाद्वारे केली आहे.