राजापूर शहरात आता आठवड्यातून एक दिवस पाणी कपात, राजापूर नगरपरिषदेचा निर्णय

कोदवली येथील सायबाच्या धरणातील पाणीसाठा मर्यादीत असल्याने पाणी पुरवठयाची सर्व मदार शीळ जॅकवेलवरच अवलंबून असते. तर शीळ जॅकवेलमधून होणार पाणीपुरवठा अनेकदा विद्युत प्रवाह खंडीत झाल्याने विस्कळीत होताना दिसतो.

  दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत असताना मार्च-एप्रिल महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा राजापूर शहरवासीयांना बसु शकतात. मात्र त्याची तिव्रता कमी व्हावी यासाठी सोमवार दिनांक १९ फेब्रूवारी २०२४ पासुन आठवडयातुन एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय राजापूर नगर परिषद प्रशासनाने घेतला आहे.

  राजापूर शहराची वाढलेली पाणी पुरवठयाची क्षमता विचारात घेत देखभाल आणि दुरुस्तीसाठी, तसेच पाण्याच्या बचतीसाठी मान्सूनच्या आगमनापर्यंत प्रत्येक विभागावर आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवणे आवश्यक राहणार असल्याचे राजापूर नगर परिषदेने एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. राजापूर शहराचा विस्तार तसेच नवीन इमारती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहरवासियांची पाण्याची गरज देखील वाढताना दिसत आहे. टंचाई कालावधीत राजापूर शहराला पाण्यासाठी केवळ शीळ जॅकवेलवर अवलंबून राहावे लागते. कोदवली येथील सायबाच्या धरणातील पाणीसाठा मर्यादीत असल्याने पाणी पुरवठयाची सर्व मदार शीळ जॅकवेलवरच अवलंबून असते. तर शीळ जॅकवेलमधून होणार पाणीपुरवठा अनेकदा विद्युत प्रवाह खंडीत झाल्याने विस्कळीत होताना दिसतो.

  सध्या शहरात नवीन कनेक्शन जोडणीचे काम, पंम्पींग यंत्रसामुग्री, मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती अशी कामेही राजापूर नगर परिषदेला करावी लागत आहेत. शहराच्या पाणीपुरवठ्या संदर्भात भविष्यातील टंचाईचा विचार करुन राजापूर नगरपरिषदेने या योजनेत पाण्याचे नियोजन केले आहे. नगर परिषदेच्या या पाणी कपात योजनेतून प्रत्येक प्रभागाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळण्यास मदत होणार आहे. राजापूर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल आणि दुरुस्ती करिता तसेच पाण्याच्या बचती करिता मान्सूनच्या आगमनापर्यंत प्रत्येक विभागावर आठवड्यातून एक दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली असुन या पाणी कपात योजनेची अंमलबजावणी सोमवार दिनांक १९/०२/२०२४ पासून सुरु होणार असल्याचे राजापूर नगर परिषदेने नागरिकांना एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.

  दिनांक १९ फेब्रूवारी २०२४ पासून खालील प्रभागात पुढीलप्रमाणे पाणी कपात करण्यात येणार आहे.

  महिन्याचा प्रत्येक सोमवार – तालीमखाना पंप हाऊस, बंगलवाडी, प्रियदर्शनी, पुनर्वसन विभाग, गुरववाडी कोर्टापर्यंत.

  महिन्याचा प्रत्येक मंगळवार – कोंढेतड विभाग, दिवटेवाडी, बागकाझी – यामध्ये संपूर्ण कोंढेतड विभाग, संपूर्ण दिवटेवाडी, साखरकरवाडी, धोपेश्वरघाटी, मुजावरवाडा, संपूर्ण बागकाजी विभाग, संपूर्ण ओगलेवाडी विभाग.

  महिन्याचा प्रत्येक बुधवार – संपूर्ण बाजारपेठ विभाग – यामध्ये भोगटे बंदरकर लाईन, आशीयाना बिल्डींग, कुडाळकर लाईन, नाखवा, खतिब, संत रोहीदासवाडी, बौध्दवाडी, मुन्श नाका ते लाकमान्य हॉटेल, लॅविश मापारी लाईन, वरचीपेठ विभाग, बावकर बंगला, लिगमघाटी, बंगलवाडी विचारे लाईन तसेच याच दिवशी चव्हाणवाडी विभाग, पंचायत समिती, भटाळी, कोर्टापासून डॉ. बाबासाहेब आबेडकर भवन, रुमडेवाडी, चव्हाणवाडी, आसरा प्लाझा, खडपेवाडी, जवाहरचौक, व्यायामशाळा, मुल्ला वठार, झरी लाईन, खान, खलिफे काझी, कुडाळी, यश अपार्टमेंट, शेड्ये घाटी, परिटघाटी.

  महिन्याचा प्रत्येक गुरुवार – आंबेवाडी विभाग – यामध्ये संपूर्ण आंबेवाडी विभागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

  महिन्याचा प्रत्येक शनिवार – रानतळे विभाग – यामध्ये संपूर्ण रानतळे, कोळेकर ते कोंबेकर घरापर्यंत, मांजरेकर, धामापूरकर गोंडाळ घरापर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.