बिबट्याच्या दहशतीखाली वावरणाऱ्या राजापूरवासीयांवर आता गवा रेड्याचे दुहेरी संकट

वन्य श्वापदांचा उपद्रव वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आता जनतेतुन होवू लागली आहे.

    जेव्हा रोम जळत होता त्यावेळी राजा निरो फिडल वाजवत होता अशीच काहीशी अवस्था राजापूर तालुक्यात वनविभागाच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. तालुक्यात आता बिबट्यापाठोपाठ गवा रेड्याचा उपद्रव होऊन जनतेचे नुकसान होत असताना वनविभागाचे अधिकारी मात्र या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

    राजापूर तालुक्यात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भितीचे वातावरण पसरले असतानाच आता पुर्व परीसरात गव्याचाही उपद्रव सुरु झाला आहे. दोन दिवसांपूर्वी परुळे येथे गवा रेड्याने सुमारे चाळीस ते पन्नास काजूच्या झाडांचे अतोनात नुकसान केल्याची घटना घडल्याने मोकाट सुटलेल्या या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला जावा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. मात्र वनविभाग सुसेगाद असल्याचे चित्र आहे.

    गेले काही महिने बिबट्याची दहशत सर्वत्र सुरु असतानाच आता गवा रेड्याचा देखील उपद्रव सुरु झाला आहे. तालुक्याच्या पुर्व परीसरात परुळे गावचे ग्रामस्थ मनोहर विनायक सावंत, यांच्या काजूच्या बागेत घुसुन गवा रेड्याने त्यांची सुमारे ४० ते ५० फळे देणाऱ्या झाडांची मोडतोड केल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये मनोहर सावंत यांचे मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वनविभागाच्या वतीने नुकसानग्रस्त बागेची पहाणी करण्यात आली. दरम्यान तालुक्यात वन्य श्वापदांचा उपद्रव वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आता जनतेतुन होवू लागली आहे.

    राजापूर तालुक्याच्या अनेक भागात बिबट्याचा मुक्त संचार दिसत असून यापूर्वी काही जणांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. राजापूर शहरातही बिबट्या राजरोसपणे फिरत असुन या बिबट्याच्या दहशतीखाली सर्वसामन्य जनता वावरत आहे. राजापूर तालुक्यातील सौंदळ, जुवाठी, कोंड्ये अशा अनेक गावातून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत असताना देखील वनविभाग मात्र हाताची घडी व तोंडावर बोट ठेवुन आहे. बिबट्याच्या हल्ल्यात काहीजण जखमी झाल्याच्या घटना घडत असताना या बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचेही अतोनात नुकसान होत आहे. याच आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात धाउलवल्ली येथे एका शेतकऱ्याच्या दोन वासरांना आपला जीव गमवावा लागला होता.

    बिबट्याच्या हल्ल्यात गुरांचे नुकसान होत असताना आता राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर गवा रेड्याचे दुहेरी संकट ओढवले आहे. काही भागात गवा रेड्याने शेती व बागायतीचे नुकसान केल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांपासुन संरक्षण करण्यासाठी वनविभागाने काहीतरी पावले उचलावीत अशी मागणी तालुकातुन होत असताना वनविभाग मात्र सोयर सुतक नसल्याच्या भुमिकेत आहे.