तृतियपंथियांच्या उच्छादाने राजापूरकर त्रस्त, पोलिसांची बघ्याची भूमिका

काही महिलांच्या हातातील पर्स काढुन घेत त्यातील सर्व रक्कम लांबवल्याने अनेकांना आता घरी तरी कसे जायचे या विचाराने रडु कोसळल्याचे चित्र पहावयास मिळाले.

    गुरुवारच्या आठवडा बाजार दिवशी राजापूरात आलेल्या तृतिय पंथियांच्या उच्छादाने आज बाजारात आलेल्या ग्रामिण भागातील गोरगरीब जनतेसह बाजारात टोपलीतून भाजी विकणाऱ्या महिलाही त्रस्त झाल्या आहेत. मात्र पोलीस प्रशासन बघ्याची भुमिका घेत असल्याने सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

    दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या दिवशी राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातून सर्वसामन्य जनता खरेदीसाठी येत असते. मात्र दर गुरुवारी याच दिवशी बाजारात येणाऱ्या तृतिय पंथियांच्या उच्छादाने सर्वसामान्य नागरिक व व्यापारी चांगलेच त्रस्त झाले आहेत. आज बाजारात सकाळपासून ठाण मांडुन असलेल्या तृतिय पंथियानी रस्त्यावर उन्हातानात बसुन भाजी विकणाऱ्या महिलांसह खेडेगावातुन आलेल्या नागरिकांना अवास्तव पैशाची मागणी करुन त्रस्त केले आहे. काही महिलांच्या हातातील पर्स काढुन घेत त्यातील सर्व रक्कम लांबवल्याने अनेकांना आता घरी तरी कसे जायचे या विचाराने रडु कोसळल्याचे चित्र पहावयास मिळाले.

    राजापूर बाजारपेठ व आठवडा बाजार परिसरात फिरत असणाऱ्या या तृतिय पंथियांच्या सात आठ जणांच्या टोळक्याने राजापूर कराना चांगलेच लुटले. तरी जवाहर चौकासह शहरात कर्तव्यावर असणारे पोलीस बघ्याची भुमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या तृतियपंथियानी जास्त करुन महिलाना टार्गेट करुन त्याना हिडीस वर्तन व शिव्याशाप याची भिती दाखवत अवास्तव पैशाची मागणी केली असल्याची चर्चा सर्वत्र सुरु होती.

    याबाबत शहरातील काही नागरिकांनी चौकात व शहर बाजारात असणाऱ्या पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. मात्र पोलिसांनी याकडे कानाडोळा केला असल्याची बाबही नागरिकानी व्यक्त केली आहे. काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे काही तृतियपंथी राजापूरच्या आठवडा बाजारात सर्वसामान्याना त्रास देत होते. मात्र त्यावेळी त्या तृतियपंथियाना राजापूर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली होती. त्यावेळी ते तृतियपंथी नसल्याचे समोर आले होते. काही पुरुष मंडळी त्यावेळी तृतियपंथियांचा वेश करुन सर्वसामान्याना लुटण्याचे काम करत असल्याचे समोर आले होते. मात्र आजही तशाच प्रकारे हे तृतियपंथी आपले कारनामे करत असल्याने शंका उपस्थित करण्यात येत आहे. तर राजापूर पोलिसांनी या तृतियपंथियाना ताब्यात घेत त्यांच्या त्रासातुन सर्वसामान्य जनतेची सुटका करावी अशी मागणी करण्यात येत आहे.