राजारामबापू कारखाना ‘सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्काराने’ सन्मानित

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास साखर उद्योगातील शिखर संस्था असणाऱ्या पुणे (मांजरी बु:) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने कै. किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्काराने गौरविण्यात आले.

    इस्लामपूर : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास साखर उद्योगातील शिखर संस्था असणाऱ्या पुणे (मांजरी बु:) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने कै. किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार (Sharad Pawar), सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या हस्ते व्हीएसआय येथील शानदार सोहळ्यात हा पुरस्कार सुपूर्द करण्यात आला.

    राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील यांच्यासह कारखान्याचे संचालक व अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्विकारला. कारखान्याचे मार्गदर्शक, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने पर्यावरण संवर्धननासाठी केलेल्या भरीव योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे.

    यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम तसेच राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, दिलीप पाटील, श्रेणीक कबाडे, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, जनरल मॅनेंजर एस.डी.कोरडे, चीफ केमिस्ट सुनील सावंत, पर्यावरण अधिकारी राजेंद्र पाटील, महेश मंडले उपस्थित होते.

    विविध पुरस्काराने सन्मानित

    राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने ‘राज्यातील सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना’ या पुरस्कारासह तांत्रिक कार्यक्षमता, आर्थिक नियोजन,ऊस विकास आदी विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध पुरस्कार मिळविले आहेत. नुकत्याच इस्लामपूर येथे झालेल्या राज्यव्यापी साखर कामगार मेळाव्यात खा.शरद पवार यांनी ‘राज्यातील साखर कारखान्यांना मार्गदर्शक साखर कारखाना’या शब्दात कौतुक केले आहे.