राजर्षी शाहू महाराज हे रयतेचे राजे म्हणून कायम हृदयात राहतील :  अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी राज्याचा वारसा पुढे नेणारे राजर्षी शाहू महाराज रयतेचे राजे म्हणून कायम हृदयात राहतील,’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.

    मुंबई : ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक न्यायाचा विचारंच महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा आहे. आधुनिक शेती, सर्वांना शिक्षण, उद्योगांना प्रोत्साहन, कलेला आश्रय, मागास बांधवांना आरक्षण या त्यांनी दाखवलेल्या मार्गानंच महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी राज्याचा वारसा पुढे नेणारे राजर्षी शाहू महाराज रयतेचे राजे म्हणून कायम हृदयात राहतील,’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.

    राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “राजर्षी शाहू महाराज खऱ्या अर्थानं रयतेचे राजे होते. रयतेनं कामासाठी सरकारकडे येण्याची गरज नाही, सरकारंच रयतेच्या दारात जाईल, हा विचार त्यांनी दिला. शिक्षणाशिवाय बहुजनांचा विकास शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली करुन दिली. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं केलं. मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना आर्थिक दंडाची तरतूद केली. नाटक, चित्रपट, संगीत कलेला आश्रय दिला. कोल्हापूरला चित्रपटनगरी बनवली. कुस्तीगिरांना प्रोत्साहन दिलं. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरासाठी संस्था काढल्या. राधानगरीसारखं धरण बांधलं. त्यांच्या संकल्पनेतून विकसित झालेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांनी जलसंधारणक्षेत्रात क्रांती केली. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकरी व्हावं, सैन्यात जावं, त्याबरोबरीनं उद्योग, व्यापार क्षेत्रातही भरारी घ्यावी, ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी कोल्हापूर संस्थानात औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारल्या. उद्योगांचं जाळं निर्माण केलं. जयसिंगपूरला बाजारपेठ वसवली. कोल्हापूर संस्थानात पायाभूत सुविधांची उभारणी करतानाच समाजात प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारांची रुजवण केली. रयतेची काळजी घेणारे, विकासाची दूरदृष्टी असलेले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणाच्या विचारांचे वारसदार म्हणून राजर्षी शाहू महाराज कायम सर्वांच्या हृदयात राहतील. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन.”