Rajendra Pawar expresses grief

राज्याच्या राजकारणातील अनेक घडामोडी घडत असताना राष्ट्वादीमधील अजितदादांचे बंड मोठा चर्चेचा विषय ठरले. आता बारामतीमध्ये लोकसभेवरून कोण बाजी मारणार यावर जोरदार चर्चा आहे. बारामतीमध्ये मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी सध्या पत्रप्रपंच सुरू असल्याचं दिसते. अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी लिहिलेल्या पत्रानंतर आता बारामतीमध्ये एक निनावी पत्र व्हायरल झाले आहे.

  NCP Split : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना, राष्ट्रवादीमधील बंडामुळे बारामतीकर मतदारांची द्विधा मनःस्थिती झाली असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर सर्वाधिक गोंधळाची परिस्थिती बारामतीमध्ये आहे. थोरल्या साहेबांना साथ द्यावी की, अजित पवारांबरोबर राहावं, अशा संभ्रमात लोक दिसत आहेत. अशातच अजित पवार यांनी एक पत्र लिहून वेगळा होण्याचा निर्णय का घेतला? याची माहिती दिली. त्यांच्या या पत्र प्रपंचानंतर आता बारामतीमध्ये एक निनावी पत्र व्हायरल झाले आहे. “बारामतीकरांची भूमिका” या नावाने हे पत्र व्हायरल झाले आहे.

  राजेंद्र पवारांकडून खदखद व्यक्त
  राजेंद्र पवारांची क्षमता असूनदेखील अजित पवारांना पुढे केले.” तसेच, तिसऱ्या पिढीत राजकारणात येण्याचा अधिकार रोहित पवार यांना होता, ते राजकारणात आल्यानंतर जळफळाट सुरू झाला, असा उल्लेख या पत्रात करण्यात आलेला आहे. या पत्रावर आता राजेंद्र पवार यांनी भूमिका व्यक्त केली आहे.

  राजेंद्र पवार काय म्हणाले?
  “जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतो, तेव्हा निनावी पत्रातून भावना व्यक्त केल्या जातात. या पत्राच्या माध्यमातून कुणीतरी खदखद व्यक्त केली आहे. मी आणि अजित पवार एकाच वयाचे आहोत. अजित पवार १९८७ साली राजकारणात आले आणि तिथून ते पुढे पुढे जाऊ लागले. शरद पवार यांचा पुतण्या असल्यामुळे कदाचित मीही राजकारणात येईल, असे त्यावेळी लोकांना वाटत होते. पण, शरद पवारांनी निर्देश दिल्यानुसार मी शेती, व्यवसाय आणि सामाजिक काम करीत राहिलो. त्यातूनच मी रोहित पवारला २१ व्या वर्षी एक मंच तयार करून देऊ शकलो”, अशी प्रतिक्रिया राजेंद्र पवार यांनी दिली.

  मी राजकारणात आलो असतो तर….
  एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की, मला एका साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याची इच्छा होती. पण शरद पवार यांनी मला जाणीवपूर्वक दूर ठेवले. मी जर त्यावेळी राजकारणात आलो असतो तर कदाचित आज जी परिस्थिती दिसत आहे, ही त्यावेळीच दिसली असती.

  पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय
  “पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं. शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं. शरद पवारांचा ओढा काँग्रेसकडे होता. याच पक्षात ते पुढे पुढे जात राहिले आणि आप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळविला. पुढची पिढी जेंव्हा तयार होत होती. तेव्हा स्व. अनंतरावांचा मुलगा अजित आणि आप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र यांच्यापैकी कोणाला राजकारणात पाठवायचे याबाबत विचार होत होता. तेव्हा दोन्ही भावांनी अनंतरावांच्या मुलासाठी काहीतरी केलं पाहीजे, म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असूनदेखील अजित पवारांना पुढे केले.”

  आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड
  “दोघांनीही त्यांना वेळोवेळी सांभाळूनदेखील घेतले. तेव्हा राजेंद्र पवारांनी बंड केलं नाही. पुढंचा इतिहास माहितच आहे. पण तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची ठरली. तेव्हा आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करुन अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला. तिथपासून खरा जळफळाट सुरू झाला होता. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशीवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या. म्हणूनच सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की, “वाजवा तुतारी गाडा गद्दारी”