
चव्हाण यांच्या खरमरी पत्राला मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करुन उत्तर दिले आहे.
कल्याण : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी एक पत्र मनसेला पाठवले आहे. ज्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावर मनसेने केलेल्या आंदोलवर भाष्य केले आहे. कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि राज्याच्या मालमत्तेची तोडफोड करुन नुकसान करतो असा सवाल उपस्थित केला होता. चव्हाण यांच्या खरमरी पत्राला मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करुन उत्तर दिले आहे. जर तुम्ही स्वबुद्धीने राज्याचे हित जपलेत तर आमच्यावर दगड भिरकावण्याची वेळच आली नसती. कोकण महामार्गावर अपघातात गेलेले बळी पाहता. कोकणातील दगडालाही पाझर फुटेल. पण गेली अनेक वर्षे सत्तेत भागीदार असताना किंवा सत्ताधीश असताना तुमचा या कोकणी माणसाचा स्वाभीमान का जागा झाला नाही अशी खोचक टिका केली आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या १७ वर्षा पासून सुरु आहे. आत्तापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च झाले आहे. परंतू हा रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्याची पाहणी खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यानी केली. त्यानंतर याच रस्त्यावरुन त्यांनी सत्ताधारी पक्षाला टिकेचे लक्ष केले. राज ठाकरे यांच्या टिकेपश्चात मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गावर तीव्र आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली. या आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी एका पत्राद्वारे मनसेला खोचक टीका केली आहे. त्यांच्या पत्राला मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
आमदार राजू पाटील यांनी साधला ट्विट द्व्यारे निशाणा
“येत्या गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेनचे काम व ह्या वर्षा अखेरीस संपूर्ण मार्गिका पूर्ण होईल ह्या आश्वासनाने थोडा दिलासा नक्कीच मिळाला. पण हा दिलासा नसून वचन असेल आणि तुम्ही ह्या वचनपुर्तीसाठी सज्ज असालच हीच आशा आहे! तरीही, कोकण महामार्गावर गेली कित्येक वर्ष होत असलेले अपघात आणि त्यात गेलेले बळी पाहता कोकणातल्या ‘दगडालाही’ पाझर फुटेल, पण गेली अनेक वर्ष सत्तेत भागीदार असताना किंवा सत्ताधीश असताना तुमचा हा कोकणी स्वाभिमान का जागा झाला नाही? जर तुम्ही स्वबुद्धीने राज्याचे हित जपलेत तर आमच्यावर दगड भिरकावण्याची ही वेळच आली नसती. आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी स्वतः तुमचा आदर्श ठेवला असता, पण काय करणार तुमच्या लेखी मात्र प्रत्येक कार्यकर्ता हा नासमज असतो, हे तुमचेच विधान नाही का? जनतेने भिरकावलेल्या दगडामागे कोणाची इच्छा नाही, तर त्यांचा उद्वेग असतो!
तुमच्या म्हणण्यानुसार जनतेला आम्ही बोळ्याने दुध पाजतो आणि तुम्ही मात्र डोळे झाकून वर्षानुवर्ष तुमच्याच मायभूमीला, आणि आपल्या चाकरमान्यांना प्रकल्प रखडवून यम सदनी धाडत आहात असे उद्गार काढल्यास तुमच्या जिव्हारी लागू नये म्हणजे झालं.
सन्माननीय राज साहेबांनी केलेले विधान अगदी तंतोतंत खरे ठरते,
“जर टोलनाके तोडफोडीची भरपाई माझ्याकडून घ्यायची असेल तर रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे मृत्युमुखी
पडलेल्या लोकांची जबाबदारी केंद्र/राज्यामध्ये बसलेले सत्ताधारी घेणार का? “
तुम्ही म्हणता तुमची निष्ठा सर्वप्रथम देशाशी आहे, म्हणूनच का द्वारकेला जायचा Expressway सात वर्षात बनतो आणि गेली सतरा वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम आजतागायत पूर्ण होत नाही. झोपलेल्या तोंडावर पाणी मारून उठवायची पद्धत आहे आणि झोपेचं सोंग घेऊन जबाबदारी झटकणार्यांना महाराष्ट्रात दगड मारून उठवायची आमची पद्धत आहे. पनवेल ते झारप ह्या मार्गाच्या कामावर स्वतः आठवेळा उतरून तुम्ही पाहणी केलीत, अहो जे तुमचं कर्तव्य आहे त्याचंच कसलं आलंय मोठेपण? आणि जर तुम्ही पहिल्या पाहाणीत योग्य ते निर्देश दिले असते तर कदाचित तुमच्यावर आठ वेळा चकरा मारायची वेळच आली नसती. जनतेला आत्ता केलेले वायदे तरी पाळावेत हीच आशा बाळगत आहोत. कारण दगड भिर्कावणाऱ्या जनतेचा जेंव्हा कोप होतो तेंव्हा ती खडी फोडायच्याही लायकीची ठेवत नाही, इतकं लक्षात असू द्या म्हणजे झालं.