एफआरपीच्या मुद्यावरून राजू शेट्टी आक्रमक; निर्णायक लढ्याची बारामतीतून होणार सुरूवात?

गेल्या काही वर्षांपासून राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. यानंतर शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, शेट्टी यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी किमान आधारभूत किंमत (एफआरपी) न देता एफआरपीच्या रकमेमध्ये विभागणी करण्यात आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात निर्णायक लढ्याची सुरुवात बारामतीतून करण्याबाबतच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

    राजू शेट्टींच्या या आंदोलनामध्ये बारामती परिसरातील शेतकरी कृती समितीचे पृथ्वीराज जाचक, सतीश काकडे व रंजन कुमार तावरे हे नेते पुढाकार घेणार आहेत. राजू शेट्टी यांनी २००८-२००९ मध्ये ऊस दरासाठी पंढरपूर-बारामती पदयात्रा काढून बारामतीमध्ये आमरण उपोषणाचा निर्णय एक लढा उभारला होता. हे आंदोलन चांगलेच गाजले होते.

    गेल्या काही वर्षांपासून राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. यानंतर शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, शेट्टी यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विकास आघाडीसह केंद्रातील सरकारवर शरसंधान साधले होते.

    ऊस उत्पादकांना यापूर्वी एकरकमी दिली जाणारी एफआरपीची रक्कम एकत्रित न देता त्यात विभागणी केल्याने राजू शेट्टी यांनी सरकारच्या या धोरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. शेट्टी यांना नेहमी साथ देणारे बारामती परिसरातील शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक, सतीश काकडे व रंजन कुमार तावरे या तिघा नेत्यांना शेट्टी यांनी पुन्हा एकत्र आणण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर एफआरपीच्या प्रश्नाबाबत निर्णायक लढ्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    दरम्यान, सतीश काकडे यांनी सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जुळते घेऊन एकत्रित निवडणूूक लढवली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मात्र काकडे यांची भूमिका वेगळी असल्याने ते स्वतः पुन्हा आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे.