
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील प्रति टन ४०० रुपये मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेला आज शिरोळ तालुक्यातून सुरुवात झाली. चारशे रुपये मिळाल्याशिवाय कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील प्रति टन ४०० रुपये मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेला आज शिरोळ तालुक्यातून सुरुवात झाली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ५२२ किलोमीटरची ही पदयात्रा सुरू आहे. चारशे रुपये मिळाल्याशिवाय कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पदयात्रा
आज कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दत्त सहकारी साखर कारखान्याच्या दारातून या आक्रोश यात्रेस सुरुवात झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासोबत हजारो शेतकरी या पदयात्रेत सहभागी होत आहेत. सरकार, राज्य शासन हे शेतकऱ्यांच्या बाजूने नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ही पदयात्रा काढत आहोत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे.
जयसिंगपूर येथे ऊस परिषद होणार
आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यासाठी आजपासून आक्रोश पदयात्रा काढली जाणार आहे. ५२२ किलोमीटर अंतराच्या पदेयात्रेचा समारोप २२ दिवसांनंतर जयसिंगपूर येथे ऊस परिषदेमध्ये होणार आहे. तोपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम संघटनेच्या वतीने केले जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
उतारा चोरी उघडकीस आणणार
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वाभिमानीने सीए पाठवून साखर कारखान्याची आर्थिक पाहणी करावी, असे राजू शेट्टी यांना उद्देशून म्हटले होते. त्यावर शेट्टी म्हणाले, आमचे सीए साखर कारखान्यात जाऊन आर्थिक पाहणी तर करतीलच पण यापुढे जाऊन कारखान्यातील उतारा तसेच वजन काट्यातील चोरी हे प्रकारही उघडकीस आणतील, असे प्रतिआव्हान दिले आहे.