
महाविकास आघाडीतून कोडीमोड घेतल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी प्रथमच २० एप्रिल रोजी बारामतीमध्ये येणार आहेत. या दिवशी राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली असलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शेट्टी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे.
बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाविकास आघाडीतून कोडीमोड घेतल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) प्रथमच २० एप्रिल रोजी बारामतीमध्ये येणार आहेत. या दिवशी राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली असलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शेट्टी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार असून, या सभेत ऊस दरावरून राष्ट्रवादीवर तोफ डागणार का, याकडे ऊस उत्पादक यांच्यासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मागील निवडणुकीपासून महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर शेट्टींची ऊस दराबाबतची आंदोलनाची धार कमी झाली होती. गेल्या काही महिन्यांपूर्वी राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधान परिषद सदस्यत्वाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. यासंदर्भात राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी येऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर राजू शेट्टी यांच्यावर टीका देखील झाली होती. त्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता.
नुकतेच शेट्टी यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन तशी अधिकृत घोषणा देखील केली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली. शेट्टी यांनी महाविकास आघाडी बरोबर येण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली असलेल्या साखर कारखान्यांवर केलेली आंदोलने त्यावेळी खूप गाजली होती. बारामतीमध्ये ऊस दरासाठी पंढरपूर बारामती पायी वारी करत बेमुदत उपोषणाचा घेतलेला निर्णय लढा संस्मरणीय आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक आंदोलने बारामतीसह पुणे जिल्ह्यात झालेली नाहीत.
२० एप्रिल रोजी भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष व शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांनी या सभेचे आयोजन केले आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दिलजमाई करून कारखान्याच्या कारभारात लक्ष देण्यास सुरुवात केलेल्या जाचक यांनी सध्या पुन्हा विरोधी भूमिका स्वीकारली आहे. छत्रपती कारखान्याची निवडणूक तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज जाचक यांनी सत्ताधारी गटाच्या विरोधात घेतलेली भूमिका राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने राजू शेट्टी यांना पृथ्वीराज जाचक यांनी निमंत्रित केले आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टी यांची पुणे जिल्ह्यातील ही पहिली सभा आहे. त्यामुळे शेट्टींच्या वक्तव्याकडे राज्याचे लक्ष लागणार आहे.