
कारखान्यांनी गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाचे ४०० रुपये द्यावेत, यासाठी आम्ही साखर कारखान्यांच्या दारात पायी जावून आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
कोल्हापूर : कारखान्यांनी गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाचे ४०० रुपये द्यावेत, यासाठी आम्ही साखर कारखान्यांच्या दारात पायी जावून आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
आम्ही केलेल्या मागणीमध्ये काही चुकीचे नाही. हे वेळोवेळी आम्ही सिद्ध करून दाखवलं आहे. परंतु कारखानदारांना सरकार पाठीशी घालणार असेल तर महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोणी फसवलं तर तुम्ही स्वत: आत्मक्लेश द्या. जेणेकरून ज्याने तुमच्यावर अन्याय केला आहे. त्यास जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून तुम्हाला तो पैसे देईल. या मागणीसाठी मी १७ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर मी आत्मक्लेश आंदोलनाला सुरूवात करत असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
संभाव्य भूमिकेबाबत निर्णय घेणार
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व कारखान्यांवर १७ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर या कालावधीत ही पदयात्रा निघेल. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत पदयात्रेची सांगता होईल. याच परिषदेत यंदाच्या हंगामात कोणती भूमिका घ्यायची हा निर्णय होईल, असे माजी खासदार शेट्टी यांनी सांगितले.
संघटना जबाबदार राहणार नाही
माजी खासदार शेट्टी म्हणाले, उद्यापासून साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारी साखर आणि त्याचे उपपदार्थ आम्ही अडवणार आहे. यामुळे माझी ट्रान्सपोर्ट कंपन्यांना विनंती आहे आमच्या कार्यकर्त्यांनी साखर आडवल्यानंतर काही झाले तर संघटना जबाबदार राहणार नाही.