
लोकसभेला कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्हीही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना लढवणार असल्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी मांडली.
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत स्पष्ट असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २२ व्या ऊस परिषदेत राजकीय बॉम्ब फोडला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्रस्थापित उमेदवारांना आणि त्याला शह देणाऱ्या कारखानदारांना धक्का देणारी घोषणा करून कोल्हापूर लोकसभेबाबत आपला पत्ता उलगडला आहे.
स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्याबाबतची त्यांनी घोषणाही मंगळवारी झालेल्या ऊस परिषदेत केली. लोकसभेला कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्हीही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना लढवणार असल्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी मांडली.
ते म्हणाले, जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर लोकसभा लढवण्यास माझ्या उमेदवारीवर संमती दिली तर मैदानात उतरणार आहे. इतकंच काय तर कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानीचा उमेदवार उभा करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची काम प्रा. जालिंदर पाटील यांनी सुरू ठेवले आहे. शेट्टी नंतर जालिंदर पाटील यांच्याकडे स्वाभिमानीचा दुसरा मोहरा म्हणून पाहिले जाते. स्वतः प्राध्यापक ते प्राचार्यपर्यंत प्रवास केलेल्या जालिंदर पाटील यांच्याकडे डॉक्टरेटची पदवीही प्राप्त आहे. शेतकरी कायदे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अचूक जाण असलेले नेते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, करवीर, पन्हाळा, चंदगड, कागल, गारगोटी तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वेगळा गट व कार्यकर्त्यांची जुनी फळी कार्यरत आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सक्षम उमेदवार मिळत नाही. अशा परिस्थितीत दोन प्रमुख नेते एकमेकांच्याकडे बोट दाखवत आहेत. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील सक्षम उमेदवार म्हणून प्रा. जालिंदर पाटील यांचे नाव समोर आले आहे, पण स्वाभिमानी शेतकरी संघटना ही स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे शेट्टी यांनी जाहीर केले आहे. जर स्वाभिमानीने कोल्हापूर लोकसभेची जागा लढवल्यास त्याचा फटका इंडिया आघाडीला बसण्याची शक्यता आहे.
सहा मतदारसंघावर दावा
आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच जिल्हा राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असून, प्रत्येक जण आपल्या प्रबळ मतदारसंघावर दावा करत आहेत. अशा परिस्थितीत ४८ पैकी सहा लोकसभा मतदारसंघावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दावा केला असून, त्या ठिकाणी उमेदवार उभा करणार असल्याचा निर्णय शेट्टी यांनी घेतला असल्याचे, प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांनी जाहीर केले आहे.
उपद्रव्य मूल्य दाखवण्याचा प्रयत्न
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र निवडणूक लढवल्यास विजयाचा मार्ग सुकर नसला तरी विरोधी उमेदवारांना पराभव करण्याची ताकद स्वाभिमानीची आहे. एक प्रकारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले उपद्रव्य मूल्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
गारगोटी तालुक्यात शक्तिप्रदर्शन
गेल्या २२ दिवसांपासून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पदयात्रेवर होती. या पदयात्रेत शेट्टी यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ ही पिंजून काढला. यावेळी गारगोटी तालुक्यात प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी आपले शक्तिप्रदर्शन केले.