लम्पी रोगापासून पशुधन संरक्षणासाठी राजू शेट्टींची मुंबई उच्च न्यायालयात धाव

या आजाराच्या पार्श्वभूमीवर दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांचे भाव सामान्यांना परवडतील अशाप्रकारे असण्याबाबत सरकारने पावले उचलावीत, अश्या मागण्या याचिकेतून करण्यात आलेल्या आहेत.

    मुंबई : देशासह संपुर्ण राज्यात लम्पी रोगाचा  ( lumpy disease ) संसर्ग वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी जनावरांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राज्यातील पशुधनामध्ये घट होतेय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण आहे. कोल्हापूरसह जवळपास 22 हून अधिक जिल्ह्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत पशुधन वाचविण्याच्या दृष्टीने अनेक मागण्या याचिकेतून केल्या आहेत.

    अहमदनगरचे सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख, शेतकरी संपतराव पवार, सरपंच तेजस घुले पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. तृणाल टोणपे, अ‍ॅड. अजित देशपांडे, अ‍ॅड. अजिंक्य उडाणे, अ‍ॅड. अक्षय देसाई यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. पशु वैद्यकीय शास्त्रात BVSc झालेल्या डॉक्टरांसोबतच प्रमाणपत्र आणि डिप्लोमा घेतलेल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना ‘लम्पी आजार योध्ये’ म्हणून अधिकार, सुविधा आणि संरक्षण देण्यात यावे, पशु वैद्यकीय शिक्षणातील पदविका अभ्यासक्रमात आवश्यक बदल करावेत व त्यांच्या सेवा ‘लम्पी’ आजारसंदर्भातील उपाय योजनांमध्ये विचारात घेण्यात याव्यात, ‘लम्पी’ आजाराने मृत झालेल्या प्रत्येक गायी-गुरांसाठी दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, ‘लम्पी’ आजाराच्या पार्श्वभूमीवर दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांचे भाव सामान्यांना परवडतील अशाप्रकारे असण्याबाबत सरकारने पावले उचलावीत, अश्या मागण्या याचिकेतून करण्यात आलेल्या आहेत.