मनोज जरांगेंची तोफ धुळ्यात धडाडणार; देणगी गोळा करणाऱ्यांविरूद्ध तक्रार करण्याचे आवाहन

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची तोफ धुळ्यात धडाडणार आहे. राज्यव्यापी दौऱ्याच्या तिसऱ्या टप्यात धुळे जिल्ह्याच्या समावेश असून लवकरच जरांगे पाटील यांची होणारी सभा आणि स्थळ जाहीर करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मनोज मोरे यांनी दिली आहे.

    धुळे : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची तोफ धुळ्यात धडाडणार आहे. राज्यव्यापी दौऱ्याच्या तिसऱ्या टप्यात धुळे जिल्ह्याच्या समावेश असून लवकरच जरांगे पाटील यांची होणारी सभा आणि स्थळ जाहीर करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मनोज मोरे यांनी दिली आहे.

    या सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काही जण देणग्या, पावत्या गोळा करण्याची शक्यता आहे. अशा व्यक्तींविरुध्द समन्वय समितीकडे तक्रार करावी, असे आवाहनही मोरे यांनी केले आहे.

    एक डिसेंबरपासून सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती युवा मोर्चा, मराठा क्रांती महिला मोर्चासह सर्व अंगीकृत संघटना धुळे जिल्ह्यात साखळी उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या दुसऱ्या टप्यात श्रीरामपूर येथे धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती युवा मोर्चा, सकल मराठा समाजाच्या वतीने धुळे जिल्हा दौऱ्याचे आमंत्रण देण्यात आले. येत्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील होणाऱ्या सभा व सभेचे ठिकाण जाहीर करण्यात येणार आहे.

    शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेदरम्यान सभेसाठी कोणीही वर्गणी अथवा पावत्या देणग्या गोळा करू नयेत. काही हित शत्रू सभेच्या नावाने देणग्या गोळा करून आंदोलन बदनाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जर कोणी परस्पर असे कृत्य करत असेल तर संयोजन समितीकडे तक्रार करावी असे कृत्य करणारे आंदोलनाशी संबंधित नसल्याचे देखील सांगण्यात आले.