हे कुटुंब ज्या पक्षात जाते, त्याच पक्षाविरोधात कार्य करीत असते, त्याचा प्रत्यय मला आज आला – राम शिंदेंचा विखे पाटलांवर गंभीर आरोप

  नगर : नगरमधील जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांच्या पॅनेलविरुद्ध उमेदवार उभा केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर रोहीत पवार आणि सुजय विखे यांची छुपी युती असल्याचे सांगितले आहे.

  जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे शरद कार्ले यांची ईश्वर चिठ्ठीने निवड झाली. मात्र जरी भाजपच्या ताब्यात बाजार समितीच्या चाव्या आल्या असल्या तरी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. सुजय विखे पाटील यांचे पीए आणि कार्यकर्त्यांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्या पॅनलच्या विरोधात उमेदवार उभे केल्याने राम शिंदे यांनी विखेंवर जोरदार टीका केली आणि याबाबत पक्षश्रेष्ठींना अहवाल सादर करणार असल्याचे शिंदे म्हणाले. सोबतच विखे ज्या पक्षात जातात त्याच पक्षाच्या विरोधात काम करतात हे ऐकलं होतं, आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असंही राम शिंदे म्हणाले.

  रोहित पवार यांच्या उमेदवाराला मदत केल्याचा गंभीर आरोप राम शिंदे यांनी लगावला. तसेच, सुजय विखे पाटलांच्या उमेदवारालासुद्धा रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मदत केल्याचे समजले आहे. त्यामुळे राम शिंदे यांनी विखे पाटील कुटुंबावर गंभीर आरोप करीत, हे कुटंब ज्या पक्षात जाते. त्या पक्षाविरोधात काम करीत असते असे सांगितले.

  सुजय विखे पाटलांचा पलटवार 

  दरम्यान, हा आरोप झाल्यानंतर सुजय विखे पाटलांनी प्रतिप्रश्न विचारत पूर्ण महाराष्ट्रात गेली 40 वर्षांपासून पवार कुटुंबाला विरोध करणारे एकमेव कुटुंब म्हणजे विखे पाटील असताना, असा आरोप करणे हे हास्यास्पद आहे. त्यांचे हे आरोप बिनबुडाचे आहेत, असे सांगितले आहे.

  रोहित पवार काय म्हणाले पाहा

  दरम्यान, रोहित पवार यांनी राम शिंदेंची खिल्ली उडवत, त्यांना आता कुठलेही काम नसल्याचे सांगितले. त्यामुळे ते प्रसिद्धी करता अशी वक्तव्य करीत असतात अशी टीकादेखील केली.