
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधानसभेत (Upcoming Election) भाजप 240 जागा लढवणार असल्याचे विधान केले आहे.
नाशिक : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधानसभेत (Upcoming Election) भाजप 240 जागा लढवणार असल्याचे विधान केले आहे. याचे पडसाद शिंदे गटात उमटत असताना आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देखील आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत जागांची मागणी केली आहे. लोकसभेच्या तीन जागा हव्यात, असे म्हणत भाजप आणि शिवसेनेच्या युतीत आम्हीही असल्याचे सांगत जागा मागितल्या आहेत.
नाशिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी संवाद साधताना हे विधान केले. यावेळी आठवले यांनी म्हटले की, आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेसोबत आम्ही एकत्र राहणार असल्याचे जाहीर केले. मात्र, यामध्ये एक मंत्रिपद आणि एक विधान परिषद सदस्यत्व मिळावे, अशी आमची अपेक्षा असल्याचे सांगत दोन ते तीन महामंडळ देखील मिळावे, असं त्यांनी म्हटले. लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेनेने तीन जागा द्याव्यात. एक शिर्डी आणि एक मुंबई आणि एक इतर जागा मिळावी, अशी मागणी केली. भाजपने मत व्यक्त केले आहे की, आरपीआय शिवसेना आणि भाजपसोबत राहिली तरच फायदा होईल, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
मध्यस्थी करून नाराजी दूर करणार
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ५० जागांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असतील तर मी मध्यस्थी करून नाराजी दूर करेन, अशी भूमिका आठवले यांनी जाहीर केली. २८ मेला शिर्डीत अधिवेशन होणार असून, त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. व्यापक पक्षबांधणी हा यामागील उद्देश आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांचा कधीही विरोध केला नाही, असेही रामदास आठवले यांनी म्हटले.
पालिका निवडणुकीत 22 जागांची मागणी
नाशिक महापालिकेत 22 जागा भाजपकडे मागणार असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी या मागण्या केल्या आहेत. नाशिक दौऱ्यावर आलेल्या रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या निवडणुका लढणार असल्याचे म्हटले आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी मंत्रिपदाबाबतही मागणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात आठवले यांना किती जागा आणि मंत्रिपद मिळतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.