“शरद पवार आजही भाजपाबरोबर” प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर रामदास आठवले म्हणाले…

रामदास आठवले म्हणाले की, “प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेशी मी सहमत नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतर हा अडचणीचा विषय सोडवण्यासाठी शरद पवारांनी सहकार्य केलं.

    मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी ( २३ जानेवारी ) शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीची घोषणा केली. अद्यापही महाविकास आघाडीतले घटक काँग्रेस-राष्ट्रवादीशी युतीबद्दल चर्चा सुरु आहे. अशातच प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना लक्ष्य केलं. शरद पवार आजही भाजपाबरोबर आहेत, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. यानंतर राष्ट्रवादीकडून प्रकाश आंबेडकरांवर टीका करण्यात येत आहे. तर, आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही यावर भाष्य केलं आहे.

    मी सहमत नाही
    रामदास आठवले म्हणाले की, “प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेशी मी सहमत नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतर हा अडचणीचा विषय सोडवण्यासाठी शरद पवारांनी सहकार्य केलं. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांबद्दल शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे.”

    उद्धव ठाकरेंबरोबरच्या युत्तीबद्दल साशंकता
    “प्रकाश आंबेडकरांना काय हवं, याची माहिती नाही. दुसऱ्या बाजूला संजय राऊतांना ओळखत नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंबरोबरच्या युत्तीबद्दल साशंकता आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र राहतील, असं वाटत नाही,” अशी स्पष्ट भूमिका रामदास आठवले यांनी व्यक्त केली.