
महायुतीचे निर्णय वरिष्ठ पातळीवर होतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोण यापेक्षा कोण नको आहे, या दृष्टीने पाऊले पडत आहेत. सातारा जिल्ह्यात नव्हे तर माढा लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात तसेच माण विधानसभा मतदारसंघातही कोण असावा यापेक्षा कोण ठेवायचा नाही याचे करेक्ट नियोजन होणार आहे, असा सूचक इशारा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजीतसिंह यांचे नाव न घेता दिला.
रामराजे म्हणाले, १० सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रथमच पदभार स्वीकारल्यानंतर सातारा जिल्ह्यात येत आहेत. शिरवळ ते रेठरे यादरम्यान अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचे मोठे कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यामुळे त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येणार आहेत. अजित पवार कराडला महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन तेथून ते कोल्हापूरला जाणार आहेत. अजित पवार यांच्या कामाचा झपाटा सर्वांना माहित आहे त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्याजवळ सातत्याने असतात. आता ही त्यांच्या स्वागताला मोठ्या संख्येने कार्यकर्ते येतील आणि संपूर्ण जिल्हा एकमुखाने त्यांच्या पाठीमागे उभा राहील, हे दाखवण्याची आता संधी आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीची बांधणी सुरू असून त्या संदर्भात आमदार मकरंद पाटील आणि आमचे नियोजनाचे काम सुरू आहे, असे रामराजे यांनी सांगितले.
उमेदवारी प्रश्नावर काय म्हणाले
माढा लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी करणार का? या प्रश्नावर रामराजे म्हणाले आताची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. महायुतीत आम्ही आहोत. मतदार संघात उमेदवार ठरला असेल तर माहित नाही, पण निवडणुकीत उमेदवार कोण यापेक्षा कोण नको हे आम्हाला माहित आहे. या विधानाद्वारे रामराजे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक प्रकारचा इशारा दिला.
आत्महत्या प्रकरणात मला गाेवू नका
फलटण तालुक्यातील नंदकुमार ननावरे यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर रामराजे यांनी मला यात गोवू नका असे स्पष्ट करीत यातील निंबाळकर कोण आहेत, याचा तपास पोलीस करतील. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या बद्दल बोलू शकत नाही. त्यांचे नेतृत्व माेठे आहे. त्यांच्याकडे कर्तृत्व आहे. बुद्धिमत्ता आहे. त्यांच्या सर्व मागण्या मान्य होत असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.