स्वरक्षणासाठी राणी लक्ष्मीबाईंचा लढावू बाणा युवतींमध्ये यावा : बंडातात्या कराडकर

राणी लक्ष्मीबाईंसारखी एक स्त्री इंग्रजांविरोधात सतत लढत राहते. आपला देह त्यांच्या हाती लागू नये यासाठी शेवटी मृत्यूला कवटाळते. यातून त्यांचे शौर्य लक्षात येते. त्यांचा लढावू बाणा व शौर्य स्वरक्षणासाठी आजच्या युवतींच्या अंगी यावा. हीच त्यांना दिलेली मानवंदना असेल, असे ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी सांगितले.

  मेढा : राणी लक्ष्मीबाईंसारखी एक स्त्री इंग्रजांविरोधात सतत लढत राहते. आपला देह त्यांच्या हाती लागू नये यासाठी शेवटी मृत्यूला कवटाळते. यातून त्यांचे शौर्य लक्षात येते. त्यांचा लढावू बाणा व शौर्य स्वरक्षणासाठी आजच्या युवतींच्या अंगी यावा. हीच त्यांना दिलेली मानवंदना असेल, असे ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी सांगितले.

  व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने क्रांतीविरांगणा राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हुतात्मा स्मारक (फाशीचा वड) सातारा ते राणी लक्ष्मीबाई यांचे माहेरगाव धावडशी अशा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना बंडातात्या कराडकर बोलत होते.

  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व्यसनमुक्त युवक संघाचे वतीने युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक क्रांतीकारकांच्या जन्मस्थळी, स्मृतीस्थळी पदयात्रा व सायकल रॅलींचे आयोजन पूर्ण वर्षभरात केले. प्रितीसंगम कराड ते येडेमचिंद्र, वाई ते कवठे, नाशिक ते भगूर, सासवड ते भिवडी, आळंदी ते राजगुरूनगर, धर्मवीरगड ते वडू बु., राजगड ते रायगड अशा विविध ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे.

  राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यस्मरणदिनाच्या निमित्ताने फाशीचा वड सातारा ते राणी लक्ष्मीबाई यांचे माहेरगाव धावडशी अशा पदयात्रेचे आयोजन केले होते. सकाळी सातच्या सुमारास राष्ट्रगीत व प्रार्थनेने हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या पदयात्रेचा प्रारंभ झाला.

  राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर धावडशी येथे असणार्‍या वाड्याची दुरावस्था झाली असून, खरंतर शासनाने या वास्तूचे रूपांतर छोट्या स्मारकात करायला हवे. राणी लक्ष्मीबाईंचा इतिहास महिला व युवतींना प्रेरणादायी असून, धावडशीमध्ये असणार्‍या त्यांच्या स्मृती प्रेरणा देण्यासाठी जपायला हव्यात.

  – विलासबाबा जवळ, मार्गदर्शक, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र.