भाजपच्या पुणे निरीक्षकपदी निवड होताच रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, ‘यंदाच्या निवडणुकीतही मोदींचा करिष्मा दिसेल’

भाजपने पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नियुक्ती केली आहे. 

    पुणे : सध्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. त्यानुसार, प्रचारसभांचा धडाकाही सुरु आहे. आत्तापर्यंत तीन टप्प्यातील निवडणुका पार पडले. तर आता चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या सोमवारी (दि.13) होत आहे. तत्पूर्वी भाजपने पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नियुक्ती केली आहे.

    माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असलेले आणि विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्रही देण्यात आले. त्यांच्या या निवडीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही भाजप जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.

    ते म्हणाले, भाजप ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात लढवत आहे. यंदाच्या निवडणुकीतही पंतप्रधान मोदींचा करिष्मा दिसेल. 2014 पेक्षा 2019 मध्ये भाजपला चांगले यश मिळाले होते. आता हीच परिस्थिती याही निवडणुकीत दिसेल. यंदाच्या निवडणुकीत 2019 पेक्षा अधिक जागा म्हणजे 403 चा आकडा आम्ही पार करू. पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ हे मोठ्या मताधिक्याने निवडणूक येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.