मायणी येथील रणरागिनी आरक्षणासाठी सरसावल्या ; अन्न त्याग उपोषणाला सुरुवात, शेकडो महिलांचा सहभाग

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आरक्षणासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी उपोषण सुरू आहे परंतु मायणी येथील उपोषण हे नेहमीच लक्षवेधी ठरलेले आहे

    मायणी : सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आरक्षणासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी उपोषण सुरू आहे परंतु मायणी येथील उपोषण हे नेहमीच लक्षवेधी ठरलेले आहे. गेल्या वेळेस केलेल्या साखळी उपोषणास मोठा प्रतिसाद मिळाला होता. मायणी व परिसरातील जवळजवळ ३० ते ३२ गावांनी या साखळी उपोषणाला पाठिंबा देऊन दर दिवस एक गाव अशा पद्धतीने उपोषण केले गेले होते. या उपोषणाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेऊन हे उपोषण स्थगित करण्यासाठी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मायणी येथे यावे लागले होते.

    मनोज जंरागे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केल्यानंतर मायणी व परिसरातील सकल मराठा बांधवांनी साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. यानिमित्ताने कॅन्डल मार्च, रास्ता रोको, राजकीय नेत्यांची अंत्ययात्रा, आधी आंदोलने लोकांच्या सहभागातून करण्यात आली शासन मराठा समाजाच्या मागणी संदर्भात हेतूपूर्वक चाल ढकल करत असल्याची भावना समस्त मराठा बांधवांमध्ये निर्माण झाली आहे. सकल मराठा समाजमध्ये आसंतोष निर्माण झाला आहे.

    मायणी सह मायणी परिसरातील चितळी, मराठा नगर, धोंडेवाडी, आधी विविध गावातील लोकांचा या आंदोलनात सहभाग असून मराठ्य नगर येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच कान्हरवाडी येथील महिला ग्रामपंचायत सदस्यांनी आरक्षणाच्या निषेधार्थ राजीनामा देऊन आपला असंतोष व्यक्त केला आहे.

    नेहमीच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या मायणी येथील महिलाही मागे नाहीत त्यांनी आज पासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुरुषांच्या बरोबरीने आम्ही आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती या महिलांनी दिली आहे. मायणी येथील शेकडो महिला आरक्षणासाठी आंदोलनामध्ये सहभागी झाल्या असून गावोगावच्या महिलांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन येथील महिलांनी केले आहे.