गुंगीचे औषध देवून तरुणीवर बलात्कार, मित्राशी शारिरीक संबंध ठेवण्याची अट, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

पाणी प्यायला दिल्यावर गुंगी आली, त्यानंतर रात्रभर रेहानने माझ्यावर बलात्कार केला. सकाळी जाग आल्यावर त्याने रात्रभर केलेल्या शारिरीक संबंधाचे फोटो मला दाखवून सर्व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

    वसई-विरार : गुंगीचे औषध देवून एका तरुणीवर बलात्कार, त्यानंतर त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून मित्राशीही शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करण्यात आल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. नालासोपारा पश्‍चिमेकडील तेली मोहल्ल्यात राहणार्‍या रेहान सरदार या 25 वर्षीय तरुणाने येथील एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे आमीष दाखवून स्वतः दिड-दोन महिने गायब झाला होता. परत आल्यानंतर सदर तरुणीला समुद्र किनारी फिरायला नेले. तिथे तिने रेहानचा मोबाईल हाती घेतल्यावर तो लग्न करुन आल्याचे फोटो तिला दिसले. हे फोटो पाहिल्यानंतर सदर तरुणीने त्याला जाब विचारल्यावर दोघांमध्ये वाद झाला.

    त्यानंतर काही दिवसांनी रेहानने दोघांचे फोटो इन्स्टाग्राम प्रोफाईवर ठेवले, त्याचा जाब विचारल्यावर त्याने भेटायला ये फोटो डिलीट करतो असे तिला सांगितले. त्याला भेटून संबंध संपवण्यासाठी सदर तरुणी गेल्यावर तिला रेहानने नालासोपारा पूर्व-संतोष भुवन येथिल पेट्रोल पंपाच्या जवळच्या लॉजवर नेले. तिथे पाणी प्यायला दिल्यावर गुंगी आली, त्यानंतर रात्रभर रेहानने माझ्यावर बलात्कार केला. सकाळी जाग आल्यावर त्याने रात्रभर केलेल्या शारिरीक संबंधाचे फोटो मला दाखवून सर्व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे मी घाबरून गप्प बसले. काही दिवसांनी याच व्हिडीओची धमकी देऊन रेहानने मला गाठले.

    नालासोपारा येथील अज्जत डबरे याच्याशी शारिरीक संबंध ठेवण्यास सांगितले. तसेच त्याने अज्जत डबरेला फोन लावून दिला त्यावेळी रेहानच्या गाडीवर बसून माझ्या जवळ झोपायला ये, नाहीतर तुझ्या भावाला मी सोडणार नाही अशी धमकी अज्जत डबरेने दिली. त्यामुळे मी तिथून कशीबशी घरी पोहोचले आणि घरच्यांना सर्व प्रकार सांगितला. माझ्या भावाने या प्रकाराचा जाब विचारल्यावर सोपारातील बुर्‍हाण चौकात रेहान सरदारने त्याला मारहाण केली. अशी तक्रार सदर तरुणीने नालासोपारा पोलीस ठाण्यात केली आहे. तिच्या तक्रारीनुसार पोलीसांनी रेहान आणि अज्जत विरुध्द ३७६,५०९,३२३,५०६,३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत असून, दोन्ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही.