
पुणे : घरकामावरून आई रागावत असल्याने रागाच्या घरात घरातून बाहेर पडलेल्या आणि चुकलेल्या अल्पवयीन मुलीला पुन्हा घरी सोडण्याचा बहाणा करून दोन तरुणांनी त्या मुलीला दुचाकीवर बसवून पडक्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना हडपसर येथील मांजरी बुद्रुक येथे घडली. पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे.
पीडित मुलीने केली पोलिसांत तक्रार
अभिषेक गणेश जगताप (वय २०, रा. मांजरी बुद्रुक) आणि निलेश नामदेव यादव (वय २०, रा. मांजरी बुद्रुक) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी १४ वर्षीय पीडित मुलीने तक्रार दिली आहे.
पीडित मुलगी शाळेत नववीत शिकते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शाळेत नववीत शिकते. तिची आई कामावरून तिला रागवत होती. त्यामुळे ती घरामधून टॉयलेटला जाऊन येते असे सांगून बाहेर पडली. चालत चालत घरापासून लांब आली. त्यावेळी अभिषेक जगतापने या मुलीला हिंदी मधून ‘तुम कहा जा रही हो? मेरा नाम अभिषेक है… मै तुम्हे घर तक छोडता हु’ असे म्हणत तिची समजूत काढली.
ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार
त्यानंतर त्याने निलेश यादव याला फोन करून बोलावून घेतले. थोड्या वेळातच निलेश हा बुलेट घेऊन त्या ठिकाणी आला. दोघांनी तिला गाडीवर बसवून जवळच्या एका पडक्या खोलीमध्ये नेले. त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्ती करीत तिच्यासोबत अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. तिने विरोध केला असता ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर हे आरोपी तिथून पसार गेले. या मुलीने घरी आल्यानंतर कुटुंबीयांना या घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली.