कराडमध्ये आढळला दुर्मिळ स्टार कासव, तस्करीचा संशय; वनविभागाकडून तपास सुरू

वन्यजीव कायद्यानुसार सर्वाधिक संरक्षिक वर्गात समावेश असलेले दुर्मिळ प्रजातीचे स्टार कासव मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना कराड शहरातील रविवार पेठेसारख्या भरवस्तीत सापडले आहे. हे कासव लहानपणापासून घरात पाळले असल्याचा आणि जाणुनबुजून सोडले असल्याचा संशय आहे.

  सातारा : वन्यजीव कायद्यानुसार सर्वाधिक संरक्षिक वर्गात समावेश असलेले दुर्मिळ प्रजातीचे स्टार कासव मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना कराड शहरातील रविवार पेठेसारख्या भरवस्तीत सापडले आहे. हे कासव लहानपणापासून घरात पाळले असल्याचा आणि जाणुनबुजून सोडले असल्याचा संशय आहे. या कासवाबद्दल मानद वन्यजीव रक्षक अथवा वन विभागाला माहिती द्यावी. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

  मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना हे कासव बेवारस स्थितीत काझी वाडा, रविवार पेठ परिसरात सापडले आहे. या कासवाबद्दल माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे. वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनरक्षक कैलास सानप यांनी हे कासव ताब्यात घेतले असून, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांनी वरिष्ठांशी चर्चा केली आहे. त्यानुसार स्टार कासवाचे लवकरच नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्यात येणार आहे.

  भारतीय स्टार कासव ही एक दुर्मीळ प्रजाती असून, या प्रजातीच्या कासवास कोरडे, रेताड, खडकाळ हवामान लागते. गवत, फळे, फुले आणि झाडांची पाने, हा त्यांचा आहार असतो. स्टार कासव ही प्रजात गुजरातमधील कच्छ, राजस्थान, ओडीसा आणि मध्य महाराष्ट्रात आढळते. स्टार कासवाच्या पाठीवर पिवळ्या आणि काळ्या रंगाची सुंदर नक्षीदार आकृती असते. हे चित्र एका पिरॅमिड सारखं दिसतं. त्याचं सौंदर्य पाहूनही काही लोक या कासवांची तस्करी करतात.

  सात वर्षाच्या कारावासाची तरतूद

  स्टार कासवाची विक्री करणे, पाळणे, शिकार करणे याला कायद्यात १० हजार रूपये दंड व ७ वर्ष कारावास, अशी शिक्षेची तरतूद आहे. स्टार कासव हा भारतातील सर्वाधिक तस्करी होणारा आणि वन्यजीव कायद्यानुसार सर्वाधिक संरक्षित वर्गातील प्राणी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जिनिव्हामध्ये झालेल्या बैठकीत कासवाला संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

  अंधश्रद्धा, औषधासाठी तस्करी

  घरासाठी शुभ आणि पैशांचा पाऊस पाडणारा प्राणी म्हणून घरात छुप्या पद्धतीने हे कासव पाळले जाते. स्टार कासवाच्या खरेदी- विक्रीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी जाहीर करण्यात आली आहे. जगभरात कासवांच्या अनेक प्रजाती आहेत. ज्यांची अंधश्रद्धेपोटी, औषधे, धार्मिक विधी करणे, या कारणांसाठी मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.