रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालक; फोन टॅपिंग प्रकरणामुळे आल्या होत्या चर्चेत 

    मुंबई : पोलीस महासंचालक आणि 1988 बॅचचे IPS अधिकारी रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, फोन टॅपिंगच्या आरोपामुळे चर्चेत आलेल्या रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी यांची महाराष्ट्र राज्यासाठी नवीन पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

    राज्य पोलीस दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती
    आयपीएस रश्मी शुक्ला यांचा राज्य पोलिसांचा पुढील पोलीस महासंचालक म्हणून विचार केला जात होता. सेठ यांनी हे पद रिक्त केले असल्याने शुक्ला यांची राज्य पोलीस दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र याबाबत शासनाने अधिकृत माहिती दिली नाही.

    रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन FIR

    काही दिवसांपूर्वी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन FIR हायकोर्टानं रद्द केले होते. त्यामुळे रश्मी शुक्ला यांना सरकारने क्लीनचिट दिली होती. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना गुप्तचर विभागाकडून फोन टॅपिंग प्रकरणं घडलं होतं, त्यात शुक्लांवर गुन्हे दाखल झाले होते. महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने स्वीकारला आहे. या निर्णयामुळे वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला होता.

    महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅप

    २०१९ मध्ये राज्य पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणात २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.