लोकसभेला राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत! शहराध्यक्ष बालाजी पवार यांची ‘नवराष्ट्र’ला खास माहिती

राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी 'नवराष्ट्र डिजिटल'सोबत बातचीत करत अधिकची माहिती दिली आहे. रासपचे पुढील धोरण, राजकीय भूमिका आणि निवडणूकीचा अजेंडा वर बालाजी पवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

  पुणे : लोकसभेची निवडणूक (Lok Sabha election 2024) जवळ येऊ लागल्याने सर्वच पक्षांनी आपली मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील लोकसभेच्या (Pune Lok Sabha) जागेवर सर्व पक्षांचे लक्ष असून तयारीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे राष्ट्रीय समाज पक्षाने (Rashtriya Samaj Paksha) देखील तयारी सुरु केली असून उमेदवाराची चाचपणी सुरु केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष बालाजी पवार (Balaji Pawar) यांनी ‘नवराष्ट्र डिजिटल’सोबत बातचीत करत अधिकची माहिती दिली आहे. रासपचे पुढील धोरण, राजकीय भूमिका आणि निवडणूकीचा अजेंडा वर बालाजी पवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

  राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीबद्दल सांगितले. ते म्हणाले, “मागील एक महिन्यापासून बैठकांचे सत्र सुरु आहे. शहराच्या मध्यवर्ती भागांसह खडकवासला, हडपसर या भागांमध्ये बुथ बांधणी सुरु आहे. सध्या रासपची रणनीती ही ‘वन बुथ टेन युथ’ असणार आहे. प्रत्येक बुथवर 10 तरुण कार्यकर्ते असणार आहे. तसेच पुण्यामध्ये पक्षप्रवेश, प्रचार व बैठका सुरु आहेत. नवीन कार्यकर्ते पक्षाला जोडल्यामुळे पक्षात जल्लोषपूर्ण वातावरण आहे.” असे मत बालाजी पवार यांनी व्यक्त केले.

  रासपचे पक्षप्रमुख महादेव जानकर यांच्या भाजपसोबत जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत. याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर बालाजी पवार म्हणाले, “सध्या पक्षप्रमुखांनी 48 जागांवर निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याप्रमाणे जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण तयारीने आम्ही जागा लढवणार आहोत. आणि शेवटी राजकारण आहे म्हटल्यांवर चर्चा तर होणारच. कारण, जानकरांची ताकद सर्वांना माहिती आहे. ते 10 ते 15 आमदार व 2 ते 3 खासदार सहज निवडून आणू शकतात. त्यामुळे प्रत्येक युतीला ते आपल्यामध्ये यावे असे वाटत आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर भाजप व राष्ट्रवादीसोबत चर्चा चालू असतात. आम्ही नगरपालिकेपासून लोकसभेपर्यंत स्वबळावर लढण्याचा निर्णय महादेव जानकर यांनी घेतला आहे.” अशी माहिती बालाजी पवार यांनी दिली.

  एक नेता गेल्याने पक्ष बंद पडत नाही

  गोपीचंद पडळकर व राहुल कुल यांच्यासारखे नेते राष्ट्रीय समाज पक्षातून तयार झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पक्ष फुटीवर व पक्ष बदलांवर बालाजी पवार म्हणाले, ‘रासप ही कार्यकर्त्यांपासून नेते घडवण्याची फॅक्टरी आहे. रासपमधून दोघं गेले तरी दहा जण यायला तयार आहेत. आणि कोणी नेता गेल्यामुळे पक्ष बंद पडत नाही किंवा पक्षाला फरक पडत नाही. जाणाऱ्यांच्या काही महत्त्वकांशा असतात, मात्र जिथं आपण तयार झालो त्या पक्षाची आपण इमानदारीने रहावं. आज एका पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षात हे थोड्या दिवसांच आहे.  जर चांगला नेता व्हायचा असेल तर एकाच पक्षात रहावं लागेल,”असे मत रासपचे पुणे शहारध्यक्ष बालाजी पवार यांनी व्यक्त केले.

  मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण ओबीसीतून नाही

  मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील रासपचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी रासपची भूमिका स्पष्ट केली आहे. बालाजी पवार म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदा अंतरवाली सराटीला उपोषणाला बसले होते तेव्हा पहिले ओबीसी नेते म्हणून महादेव जानकर यांनी त्यांची भेट घेतली. रासपची स्पष्ट भूमिका आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु ओबीसी मधून नाही. कारण ओबीसीमध्ये खूप जाती आहेत. त्यामुळे ओबीसीचे आरक्षण कमी होणार आहे. पण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे कारण त्यांच्या मध्ये देखील वंचित आणि गरिब घराणे आहेत. पण ओबीसीमधून नाही. यासाठी पहिला ओबीसी मोर्चा आम्ही दिल्लीमध्ये काढला. मागील 10 ते 15 वर्षांमध्ये महादेव जानकर यांनी ओबीसी सामाजाचे जेवढे मुद्दे उचलले तेवढे कोणीच उचलले नाही,” असा दावा रासप पक्षाचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी केला आहे.