रत्नागिरीत बेकायदा सावकारी व्यवहार सुरु, पोलिसांनी व्यवहार करणाऱ्यावर केली कारवाई

रत्नागिरी स्थित एका वकिलांच्या कार्यालयामध्ये नोटरीवर आपली सही केली. परंतु नोटरी मधील मजकूर वाचून पाहिला नाही. तसेच त्याच्या सांगण्याप्रमाणे आपल्या एच.डि.एफ.सी बँक खात्याचे दोन कोरे चेक सही करुन दिले.

  रत्नागिरी : एका शासकिय सेवेतील फिर्यादीने पाच वर्षांपूर्वी आपण सेवेत येण्यापूर्वी मुंबई येथे एक फ्लॅट कर्ज काढून आपल्या नावावर घेतलेला होता. याच फ्लॅटचे कर्जाचे मासिक हप्ते तो आपल्या मासिक वेतनातून नियमित फेडत देखील होता. परंतु मे २०२३ मध्ये आपल्या वेतानातून आयकर कपात झाल्याने त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. आपला उदरनिर्वाह तसेच घेतलेल्या फ्लॅटचे हप्ते नियमित भरणे शक्य होत नसल्याने होणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून त्याने सडा मिऱ्या येथे राहणाऱ्या श्री. वैभव सावंत ह्याला आपली अडचण सांगितली व त्याच्याकडे 1,20,000/- मागीतले.

  प्रसंगी वैभव सावंत याने आपल्याकडे एवढे पैसे नाहीत परंतु आपल्या ओळखीच्या एका मित्राकडून (गोमतेश रा. रत्नागिरी) तुला सावकारी व्याजी पैसे घेऊन देतो पण त्याचे दरमहा 20% व्याजाने पैसे भरावे लागतील असे सांगितले. आर्थिक अडचणीत सापडलेल्या या सरकारी नोकराने त्यावर होकार दिला व पुढे दिनांक २७/०५/२०२३ रोजी वैभव सावंत याच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन आपली आर्थिक गरज भागण्याकरिता जयस्तंभ, रत्नागिरी स्थित एका वकिलांच्या कार्यालयामध्ये नोटरीवर आपली सही केली. परंतु नोटरी मधील मजकूर वाचून पाहिला नाही. तसेच त्याच्या सांगण्याप्रमाणे आपल्या एच.डि.एफ.सी बँक खात्याचे दोन कोरे चेक सही करुन दिले.

  वैभव सावंत याने ठरलेल्या 1,20,000/- पैकी 80,000/- रोख स्वरुपात दिले व उर्वरित रक्कमे पैकी 20,000/- वकीलाची फी व 20,000/- सावकारी व्याजाचा एक आगाऊ हप्ता आहे असे सांगून पैसे काढून घेतले. सावकारी व्याजाने मिळालेल्या या पैशांचे हप्ते ऑक्टोबर २०२३ मध्ये भरण्याकरिता या सरकारी नोकराला उशीर झाल्याने वैभव सावंत याने पुढचा हप्ता जास्त द्यावा लागेल असे सांगून 25,000/- रोख रक्कम घेऊन ती (गोमतेश रा. रत्नागिरी) याच्या खात्यात जमा केल्याचे सांगून स्वत:च्याच खात्यात जमा केली.

  त्यानंतर वैभव सावंत याने व्याजाच्या हप्त्यासाठी या सरकारी नोकराला व त्याच्या कुटुंबीयांना वारंवार फोन करण्यास सुरुवात केली व तू गोमतेशला ४० लाख द्यायचे आहे आणि तसे तू नोटरीमध्ये लिहून दिले आहेस, असे सांगून आपल्याकडे असलेले कोरे चेक बाऊन्स करून तुझी नोकरी घालवणार अशी धमकी देऊन मानसिक त्रास देऊ लागला.

  या प्रकरणामध्ये प्रत्यक्षात 1,20,000/- रुपये घेतलेले असताना 40 लाख रुपये घेतल्याचे खोटी नोटरी करून विश्वासघात करुन फसवणूक केल्याचे व घेतलेली रक्कम परत करत असून देखील कोणताही सावकारी व्यवसायाचे परवाना नसताना अवैध व्याज आकारुन हप्ता देण्यासाठी वारंवार फोन करुन धमकी देऊन मानसिक त्रास दिल्या गेल्याचे लक्षात आल्यावर या सरकारी नोकराने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठले.

  रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे सदरबाबत गुन्हा रजिस्टर नंबर ४६३/२०२३ भा.द.वि.सं. कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ५०६, ३४ सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व या गुन्ह्या मधील आरोपी वैभव राजाराम सावंत, ३१ वर्षे, रा. राम मंदिर झारणी रोड, ता. जिल्हा रत्नागिरी यास दिनांक ०५/१२/२०२३ रोजी अटक करण्यात आलेली आहे.

  सदर गुन्ह्यामध्ये तपास पथकाने छापा टाकला असता अनेक महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आलेले आहेत व सदर आरोपीने ३५ हून अधिक जणांना अश्याच प्रकारे अवैध सावकारी कर्ज देऊन नोटरी-करारनामा दर्शवून व्याज घेतलेले आहे. ज्यात लाखो रूपयांचे व्यवहार प्राथमिक स्वरुपात निष्पन्न होत आहेत. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. ही कामगिरी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शैलेश सणस व पो.उ.नि श्री. आकाश साळुंखे, तसेच पोलीस हवालदार दीपक साळवी, अरुण चाळके, अमोल भोसले, म.पोना रिषिता गांवकर, पो.कॉन्स्टेबल अमित पालवे तसेच सहकारी संस्था (AR), खेडचे सहायक निबंधक श्री. संभाजी मोरे यांनी केली आहे.

  पोलीस अधीक्षकांचे आवाहन:
  अवैध सावकारी संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास तात्काळ ईमेल/अर्ज अथवा प्रत्यक्ष भेटून तक्रार करू शकता. अवैध सावकारी व त्यातून होणारी पिळवणूक रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दल कठोर पाऊले उचलेल. कर्ज घेण्याच्या कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन केले आहे.