कसब्यात विरोधात लढणारे धंगेकर आणि रासने एकाच व्यासपीठावर म्हणाले, ‘आम्ही दोघे मित्रच…’

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीत एकमेकांवर टीका करणारे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि प्रतिस्पर्धी उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले.

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीत एकमेकांवर टीका करणारे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि प्रतिस्पर्धी उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. आम्ही दोघे चांगले मित्र असल्याचे दोघांनी नमूद करीत शहराच्या विकासाकरीता काम करीत राहू, असा शब्दही पुणेकरांना दिला आणि पुण्याच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांच्या विकास निधीमधून कसबा गणपती मंदिर परिसरात साकारण्यात आलेल्या पाच भित्तिचित्राचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भाग संघचालक ऍड. प्रशांत यादव यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने आयाेजित कार्यक्रमात आमदार धंगेकर आणि रासने यांच्यासह खासदार बापट यांचे चिरंजीव गौरव बापट उपस्थित होते. पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीनंतर हे दोघे प्रतिस्पर्धी एकाच व्यासपीठावर एकत्र दिसल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. व्यासपीठावर दोघांनी एकमेकांशी गप्पाही मारल्या. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, दोघांनी आम्ही मित्रच असल्याचे नमूद केले.

कसबा विधानसभा मतदारसंघात खासदार बापट यांच्या विरुद्ध दोनवेळा निवडणूक लढविल्याची आठवण धंगेकर यांनी केली. ते म्हणाले, ‘बापट यांच्या पावलावर पाऊल टाकून मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. गेली तीन दशके बापट यांनी शहरात काम करताना, राजकीय स्तर कसा ठेवावा हे दाखवून दिले आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला बराेबर ठेवून त्यांनी काम केले आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने हाेणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हा दाेघांना एकत्रित आणण्याचे काम त्यांनी केली.’’

महापालिकेत रासने यांच्यासाेबत मी काम केल्याचे नमूद करीत धंगेकर म्हणाले, ‘चारवेळा स्थायी समितीचे अध्यक्ष भूषविणारे रासने यांच्या अनुभवाचा मी मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी फायदा घेणार आहे. विजय किंवा पराजय हा निवडणुकीत असताे,आपल्या खांद्यावरील पताका पुढे घेऊन जायचे असते. शहराच्या विकासाकरीता आम्ही दाेघे एकत्रित काम करु.’’

रासने यांनी निवडणुकीचा संदर्भ घेत आम्ही प्रतिस्पर्धी नसतो.आम्ही दोन वेगवेगळ्या मत प्रवाहाचे उमेदवार असतो असे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘आम्ही केलेल्या कामांचा आशिर्वाद लोकांकडे मागत असतो.त्यामध्ये जनता दोघांना देखील आशिर्वाद देत असते.मात्र जनता ज्या उमेदवाराला अधिक आशिर्वाद देते तो निवडून येतो आणि दुसरा त्याच्या पद्धतीने काम करीत असतो.तसेच आम्ही दोघे यापुढील काळात देखील शहराच्या विकास कामांसाठी एकत्रित येऊ’’.