ravindra dhangekar

गेल्या दशकभरापासून पुणे शहर लोकसभा मतदारसंघावरचे (Pune Lok Sabha) वर्चस्व भारतीय जनता पक्ष (BJP) पुन्हा राखणार का अशी शंका मतदानानंतरचे वातावरण पाहता येऊ लागली आहे .

  पुणे / दीपक मुनोत : गेल्या दशकभरापासून पुणे शहर लोकसभा मतदारसंघावरचे (Pune Lok Sabha) वर्चस्व भारतीय जनता पक्ष (BJP) पुन्हा राखणार का अशी शंका मतदानानंतरचे वातावरण पाहता येऊ लागली आहे. विशेषत: पूर्व पुण्यातील जुन्या पेठा आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्राच्या एकगठ्ठा मतदानामुळे आणि ‘काम करणारा कार्यकर्ता ‘ या महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्या प्रतिमेमुळे भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक आवाहनात्मक ठरली आहे. सुरवातीला एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणूकीत शेवटी चांगलाच रंग भरला.

  लोकसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाचे पारडे खूपच जड होते. त्याला कारण २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपला मिळालेले प्रचंड मताधिक्क्य. तशातच, मोहोळ आणि जगदीश मुळीक यांनी अनुक्रमे कुमार विश्वास आणि बाबा बागेश्वर धाम फेमस स्वामी धीरेंद्र शास्री यांचे खर्चिक कार्यक्रम घेत, जणूकाही उमेदवारीची घोषणा तेवढी बाकी आहे, त्यानंतर दोघांपैकी एकाच्या विजयाची घोषणा ही केवळ औपचारीकताच, असे वातावरण तयार केले होते. तशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनिल देवधरही शड्डू ठोकून मैदानात उतरले. एकीकडे हे सर्व सुरू असतांना विरोधी आघाडीत, काँग्रेस पक्षात शांतताच होती. मात्र, ʻकसबा पॅटर्नʼ फेम धंगेकरांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आणि निवडणुकीत रंग भरला.

  पूर्व भाग आणि पश्चिम पुणे असे कप्पे असलेल्या या निवडणुकीमध्ये अनेक पदर आहेत. स्वतः धंगेकर यांच्या विषयी असलेली चांगली ‘माऊथ पब्लिसिटी ‘, काँग्रेसचे पारंपरिक मतदान तसेच ʻआपʼ, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे मतदान यामुळे ही निवडणूक कसबा पोटनिवडणुकीप्रमाणे चांगलीच चुरशीची झाली.

  या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक विरोधात असलेले अल्पसंख्यांकाचे जनमत पुण्यात प्रकर्षाने उमटले आहे. त्यांना संबंधितांकडून, ‘पंजा’ चे बटण दाबण्याचा सुप्त संदेश पध्दतशीर दिला गेला. त्यासाठी, डाव्या तसेच समाजवादी विचारसरणीचे सध्या चर्चेत असलेले कार्यकर्ते, यांच्यासोबत अल्पसंख्यांक समाजातील, चळवळ्या कार्यकर्त्यांनी बैठका घेतल्या. मोदींविरोधात हिंदूही, अशाप्रकारे बोलत आहेत असा संदेश पसरवून त्याचे रुपांतर अल्पसंख्यांकांचे ७० टक्के मतदानापर्यंत नेण्यात आले.

  अनिस सुंडके हे ‘एमआयएम’चे उमेदवार शेवटच्या टप्प्यातही फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. प्रकाश आंबेडकर प्रणित वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांनाही मतदान किती हजारांमध्ये झाले आहे याविषयी शंकाच आहेत. त्यामुळे धंगेकर यांच्या हिश्शात फार काही वजावट झाली नाही, अशी चर्चा होत होती. अर्थात, असे असले तरी तिरंगी, चौरंगी लढत हे नरेटीव, काँग्रेसला रोखता आले नाही. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान हे झालेच.

  पुणे लोकसभेतील आजवरच्या खासदारांपैकी मोहन धारिया, अण्णा जोशी, गिरीश बापट आणि अनिल शिरोळे हे तीन भाजपचे नगरसेवक खासदार झाले. नगरसेवक ते विद्यमान आमदार असा प्रवास केलेला रवींद्र धंगेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात प्रमुख लढत झाली.

  पुणे शहर लोकसभा मतदारसंघ प्रारंभी काँग्रेसच्या ताब्यात होता. मात्र, १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत राम मंदिर बाबरी मशीद वादाचे देशभर वातावरण असताना ल.सो. तथा अण्णा जोशी यांच्या माध्यमातून भाजपचा पहिला खासदार पुण्यात निवडून आला.

  भाजपने दिला तरूण चेहरा

  १९९६ च्या निवडणुकीत सुरेश कलमाडी यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेच्या बळावर हाती पुण्याच्या राजकारणात ताबा मिळवला. १९९८ मध्ये तत्कालीन काँग्रेसचे विठ्ठल तुपे आणि १९९९ मध्ये भाजपचे प्रदीप रावत हे खासदार पदावर निवडून आले. मात्र, पुण्यावर कलमाडी यांचाच अंमल होता. २०१४ पर्यंत कलमाडी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बदनाम झाले. त्यांचे राजकारण तुरुंगवास आणि आजारपण यामुळे संपुष्टात आले. २०१४ मध्ये भाजपचे अनिल शिरोळे यांनी काँग्रेसचे विश्वजीत पतंगराव कदम यांचा पराभव केला. त्यानंतर पुण्यावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. २०१९ मध्ये गिरीश बापट निवडून आले. बापट यांच्या निधनामुळे भाजपने मोहोळ यांच्या माध्यमातून तरुण चेहरा दिला होता.